लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेके टोळीतील सदस्यांच्या मदतीने अल्पवयीन मुलींना देह व्यापारात अडकविणारी अर्चना दोन वर्षांपूर्वी एका विमान कंपनीत भोजन पुरविण्याचे काम करीत होती. या व्यवसायात तिला चांगली कमाई होत असे. व्यवसाय बंद झाल्यानंतर एका महिलेने तिला सेक्स रॅकेट कसे चालवावे हे शिकविले. त्यानंतर ती देहव्यापार करु लागली.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने १७ मे रोजी वाठोडाच्या मोतीलाल नगरात धाड टाकून अर्चना वैशंपायनला तीन अल्पवयीन तसेच एका युवतीच्या माध्यमातून देहव्यापार करताना पकडले. तपासात एक पीडित अल्पवयीन रोहित रामटेके टोळीच्या इशाºयावर अजनी ट्रॅप घडविणाऱ्या युवतीच्या माध्यमातून अर्चनाकडे आल्याचा खुलासा झाला. त्यानंतर प्रकरण गंभीर झाले. रामटेके टोळीतील युवती कोतवाली आणि अजनी पोलिसांच्या टार्गेटवर आहे. तरीसुद्धा तिचे अर्चनाच्या अड्ड्यावर येणे जाणे सुरु होते. धाड टाकण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ती अर्चनाला भेटून निघून गेली होती. ही बाब माहीत झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. ही युवती रामटेके टोळीशी निगडित राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आहे. ही व्यक्ती नेहमी रामटेके टोळी आणि युवतींची सेवा घेतात. त्यांना आश्रय असल्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. अर्चनाची कथाही दु:खदायक आहे. बालपणी बहिणीने धक्का दिल्यामुळे ती ७५ टक्के जळाली होती. गरीब परिवार असल्यामुळे ती लहान मोठे काम करीत होती. दोन वर्षांपूर्वी एका विमान कंपनीत भोजन पुरविण्याचे काम करीत होती. दरम्यान तिला मुलगा झाला. भोजन पुरविण्याचे काम बंद झाल्यामुळे कामाच्या शोधात असताना तिची ओळख एका महिलेशी झाली. या महिलेने देहव्यापारातून चांगली कमाई होत असल्याचे सांगितले. त्या महिलेनेच तिला देह व्यापाराचे संचालन कसे करावे हे सांगितले. सहज ग्राहक मिळाल्यामुळे अर्चनालाही हा व्यवसाय चांगला वाटला. वाठोडात पकडल्या गेलेला अर्चनाचा हा तिसरा अड्डा आहे. देहव्यापार करीत असताना अर्चना रोहित रामटेके टोळीतील सदस्य असलेल्या युवतीच्या संपर्कात आली. या युवतीजवळ अल्पवयीन मुलींचे मोठे नेटवर्क आहे. ती गरीब आईवडिलांच्या भांडणाची शिकार असलेल्या अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी तयार करते. ती अर्चनाला अल्पवयीन मुली पुरवू लागली. अल्पवयीन मुलींची अधिक मागणी असल्यामुळे अर्चनाला सहज ग्राहक मिळू लागले. पोलीस अर्चनाशी निगडित युवती आणि इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर तपास अधिकारी वाठोडाच्या निरीक्षक आशालता खापरे यांनी अर्चनाला आज न्यायालयासमोर हजर केली. न्यायालयाने तिची पोलीस कोठडी २२ मे पर्यंत वाढविली आहे.
पोलीस घेत आहेत शोध
‘लोकमत’ने या प्रकरणाची सत्यस्थिती बाहेर आणल्यानंतर पोलीस आरोपी आणि त्यांच्याशी निगडित व्यक्तींचा शोध घेत आहेत. रामटेके टोळी आणि त्यांच्याशी निगडित व्यक्ती अल्पवयीन मुलींचे शोषण करीत होते असे सांगण्यात येत आहे. त्या मोबदल्यात पोलिसांना युवतींकडुन चांगली रक्कम मिळत होती. पोलिसांना हव्या असलेल्या युवतींचा शोध लागल्यानंतर त्याचा खुलासा होणार आहे. पोलिसांना गँगरेपचे प्रकरण कळाल्यानंतर हव्या असलेल्या युवतीची माहिती मिळाली होती. परंतु पुरावे नसल्यामुळे पोलीस हतबल झाले होते. युवती इतक्या सहजपणे जाळ्यात अडकेल असे पोलिसांनाही वाटले नव्हते.