नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधी पोलीस आणि नंतर सीबीआयसाठी आव्हान ठरलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा होण्याचे संकेत मिळाले आहेत. पोलिसांच्या हाती यासंबंधाने महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती असून काही दिवसांतच या बहुचर्चित हत्याकांडाचा खुलासा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
आर्किटेक्ट असलेले निमगडे यांच्यासोबत काही जणांचा सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. वर्धा मार्गावर असलेल्या या जमिनीचा साैदा १९८२ ला इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पज सोसायटीसोबत निमगडे यांनी ३३ लाखात केला होता. मात्र, पैशाचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे जमिनीचा सौदा भसकला अन् वाद वाढला. पुढे जमिनीची किंमत कोट्यवधीत गेली अन् वाद सुटण्याऐवजी चिघळतच गेला. या पार्श्वभूमीवर, नेहमीप्रमाणे ६ सप्टेंबर २०१६ ला एकनाथ निमगडे गांधीबाग गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेले. सकाळी ७ च्या सुमारास ते त्यांच्या एमएच ३१-एव्ही-२६९ क्रमांकाच्या मोपेडने लाल इमली मार्गावरून घराकडे निघाले. अचानक काळ्या रंगाच्या मोपेडवर तोंडाला स्कार्फ बांधलेल्या तरुणाने त्यांना अडविले आणि देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार करून निमगडे यांची हत्या केली. या हत्याकांडाने नागपूरच नव्हे तर त्यावेळी राज्यभरात खळबळ उडाली होती. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शहरातील संतोष आंबेकर, दिवाकर कोतुलवारसह बहुतांश बड्या गुन्हेगारांची कसून चौकशी केली होती. मात्र, पोलिसांना मारेकरी शोधण्यात यश आले नसल्याने अखेर एकनाथ निमगडे यांचे चिरंजीव अॅड. अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली होती. त्यानुसार, प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आले.
सीबीआयच्या दिल्ली, मुंबईतील अधिकाऱ्यांनी नागपुरात अनेकदा येऊन निमगडेंच्या हत्याकांडाचा छडा लावण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी अनेकांची चौकशीही केली. कोणताच धागादोरा मिळत नसल्याचे पाहून सीबीआयने या हत्याकांडातील आरोपींची माहिती देणाऱ्यास लाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे जुलै २०१९ मध्ये जाहीर केले होते. परंतु त्याचाही आतापर्यंत फायदा झाला नाही.
----
सीबीआयच्या पथकासोबत चर्चा
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकासोबत निमगडे मर्डर मिस्ट्रीबाबत चर्चा केली. त्यानंतर मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी त्यांनी या हत्याकांडाशी संबंधित धागेदोरे मिळवल्याची खास सूत्रांची माहिती आहे. या संबंधाने अमितेशकुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सद्यस्थितीत याबाबत असे काहीच बोलता येणार नसल्याचे म्हटले.
-----