लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्किटेक्टची काम करण्याची क्षमता व तांत्रिक बाबींच्या आधारावर त्यांची श्रेणी निश्चित करून नासुप्रच्या धर्तीवर महापालिकेतही आर्किटेक्टचे पॅनल तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली.आर्किटेक्टची श्रेणी निश्चित नसल्याने त्यांना काम देताना अनेकदा अडचणी येतात. अनेकदा लहान आर्किटेक्ट मोठ्या प्रकल्पासाठी निविदा सादर करतात, नंतर प्रकल्पातून बाजूला होतात. याचा परिणाम प्रकल्पाच्या कामावर होतो. याचा विचार करता नासुप्रच्या धर्तीवर महापालिकेत आर्किटेक्टची श्रेणी निश्चित झाली पाहिजे. त्यानुसार काम देणे शक्य होईल. यामुळे महापालिकेलाही फायदा होईल.कन्हान नदीचे पाणी पेंच प्रकल्पापर्यंत नेण्यासाठीचा प्रकल्प २२ कोटींच्या आसपास आहे. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करून अभ्यासासाठी निविदा काढली जाणार आहे. हे काम तांत्रिक स्वरूपाचे असून किचकट आहे. यावर ९७.६२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आर्किटेक्टची श्रेणी निश्चित केली तर यातून महापालिकेलाच लाभ होणार असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.
जप्त मालाचा लिलाव करण्याचे अधिकार आयुक्तांनाजकात नाक्यावर जप्त करण्यात आलेल्या मालाचा गतकाळात वेळोवेळी लिलाव करण्यात आला आहे. त्यानंतरही काही माल शिल्लक आहे. हा माल १७ ते १८ वर्षांपूर्वीचा आहे. याची किंमत सुमारे ३५.१६ लाख आहे. यातील बहुुसंख्य माल कालबाह्य झाला आहे. सुरक्षेवर खर्च करावा लागत आहे. या मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पिवळी नदीवर पूल उभारणारनारी घाटाजवळ पिवळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्याबाबतच्या निविदा चारदा बोलविण्यात आल्या. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एकमेव निविदाकार मे. कुमार बिल्डर्स यांनी २०.११ टक्के अधिक दराची निविदा सादर केली. वाटाघाटीनंतर १८.११ टक्के अधिक दरावर काम करण्याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कामावर ३.३६ कोटींचा खर्च केला जाणार आहे.