निशांत वानखेडे
नागपूर : ‘शाेधाल तर सापडेल’ हे बाेधवाक्य घेऊन काम करणाऱ्या परमाणू खनिज अन्वेषण आणि संशाेधन संचालनालयाद्वारे (एएमडी) गाेंदियाच्या आमगाव जवळ ‘युराेनियम’च्या साठ्याबाबत मिळालेल्या संकेतानुसार गेल्या काही वर्षांपासून संशाेधन सुरू आहे. किती टन साठा असेल, हे स्पष्ट नसले तरी काही सकारात्मक संकेत विभागाच्या संशाेधकांना मिळत आहेत. यामुळे आण्विक ऊर्जा क्षेत्रात ही उपलब्धी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एएमडीचे संशाेधक धीरज सिंह यांनी सांगितले, गाेंदिया जिल्ह्यात ‘प्राेटेराेझाॅइक’ काळातील खडक आढळून आले हाेते. या खडकांमध्ये मुबलक प्रमाणात युरेनियम खनिज सापडते. त्यानुसार काही वर्षांपूर्वी या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. एएमडीच्या कार्य पद्धतीनुसार आधी हेलीबाॅर्न हवाई सर्वेक्षण, यानंतर भूसर्वेक्षणामध्ये रेडिओमेट्रिक, जिओफिजिकल व जिओकेमिकल सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर ड्रिलिंग करून काढलेल्या मूलद्रव्याचे प्रयाेगशाळेत विश्लेषण करण्यात येते व शेवटी किती टन साठा असू शकताे, यावर संशाेधन केले जाते. गाेंदिया जिल्ह्यात सध्या ड्रिलिंग करून काढलेल्या मूलद्रव्याचे प्रयाेगशाळेत अॅनालिसिस केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. युरेनियम आहे की नाही किंवा असेल तर किती टन आहे, हे सध्या सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सकारात्मक काही निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अशाच प्रकारचे सर्वेक्षण राजस्थानच्या जयपूरमध्येही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कुठे हाेताे युरेनियमचा उपयाेग?
युरेनियमचा सर्वात माेठा उपयाेग ऊर्जा निर्मितीसाठी हाेताे. साठा अधिक आढळल्यास ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात रेडिएशन व इतर कामासाठी, कृषी क्षेत्रात, उद्याेग क्षेत्रात आणि सिव्हेज डिस्पाेजलसाठी युरेनियमचा उपयाेग केला जाताे. माेठमाेठ्या बंदरावर साठलेली माती दूर करण्यासाठी युरेनियमचा उपयाेग केला जाताे.
देशात सर्वाधिक आंध्रप्रदेशात
आंध्रप्रदेश २,०८,८८५ टन, झारखंड ८०,१८५ टन हे दाेन सर्वाधिक युरेनियम उत्पादक राज्य आहेत. याशिवाय मेघालय २३,२६८ टन, तेलंगणा १८,५५० टन, राजस्थान १४,२९५ टन, कर्नाटक ७३०३ टन, छत्तीसगड ३९८६ टन, उत्तरप्रदेश ७८५ टन, हिमाचल प्रदेश ७८४ टन व महाराष्ट्रात ३५५ टन साठा आहे.