लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता आठवड्याभरापूर्वीच संपली असताना आता पुन्हा आजपासून आचारसंहिता लागू झाली लागल्याने धोरणात्मक निर्णयावर मर्यादा येणार आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.
उमरेड विधानसभा मतदारसंघांतर्गत उमरेड तालुक्यातील १४ व कुही तालुक्यातील सर्वाधिक २५ अशा एकूण ३९ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आ. राजू पारवे यांनी भाजपकडून हा मतदारसंघ खेचण्यात यश मिळविले होते. त्यामुळे यावेळी पारवे यांची एकप्रकारे दुसऱ्यांदा परीक्षा होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील काटोल तालुक्यातील ३ व नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं. मध्ये िनवडणूक होईल. गृहमंत्रीपदाच्या वजनामुळे देशमुख ही गावे जिंकतात की विरोधक एकत्र येवून मात देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. हिंगणा विधानसभेअंतर्गत येणाऱ्या १६ ग्रा.पं. मध्ये सामना रंगेल. या मतदारसंघात एरव्ही भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत होते. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येऊन आ. समीर मेघे यांना टक्कर देतील का, असा प्रश्न आहे.
जि.प. सदस्यांचीही कसोटी
- जिल्हा परिषदेची निवडणूक व्हायला वर्ष व्हायचेच आहे. नव्या जि.प. सदस्यांकडून गाव नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी हातभार लावण्यापास ते विजय मिळविण्यापर्यंत जि.प. सदस्यांचीही कसोटी लागणार आहे.
तालुका ग्राम पंचायती
काटोल- ३
नरखेड- १७
सावनेर-१२
कळमेश्वर-५
रामटेक-९
पारशिवनी-१०
मौदा-७
कामठी -९
उमरेड-१४
कुही-२५
नागपूर ग्रामीण -११
हिंगणा-५
--