नागपूर : फुकटात नाश्ता मागितल्यावरून रेस्टॉरंटमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तोडफोड आणि हाणामारीत झाले. काही जणांनी या घटनेला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत दोन्ही गटांवर कारवाई केली.
प्रतापनगरात पांडे यांचे राणाप्रताप रेस्टॉरंट आहे. आरोपी शहजाद अंसारी आणि त्याचा साथीदार तेथे सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास नाश्ता करायला गेले. आधी पैसे देऊन कुपन घेतल्यानंतरच येथे खाद्यपदार्थ मिळतात, त्यामुळे काउंटरवरून कूपन घे, नंतर नाश्ता मिळेल, असे रेस्टॉरंटमधील शिवलाल कटरा यांनी सांगितले, तर शहजाद याने कटरा यांना पहले नाश्ता दो, बाद मे पैसे मिलेंगे असे म्हणत वाद घातला. खाने के बाद भाग जा रहा क्या, असाही सवाल केला. त्यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
प्रकरण हातघाईवर आल्यानंतर एकमेकांना त्यांनी मारहाण केली. तेवढ्यात शहजादचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी तेथे तोडफोड केली. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे वातावरण तापले. आरडाओरड, शिवीगाळ सुरू असतानाच काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ बनविला. तो सोशल मीडियावर व्हायरल करून या घटनेला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माहिती कळताच प्रतापनगरचे पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी, उपनिरीक्षक राऊत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटांतील मंडळींना पोलीस ठाण्यात आणले.
आधी आरोप-प्रत्यारोप, नंतर घूमजाव
दोन्हीकडून आधी आक्रमकपणे आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेताच दोघांनीही घूमजाव करत आपली भूमिका बदलली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कटरा आणि शहजादची तक्रार घेऊन दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली.