काटाेल (नागपूर) : लग्नातील डीजेच्या तालावर नाचताना वादाची ठिणगी पडली आणि १२ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने २७ वर्षीय तरुणाच्या छातीवर चाकूने वार करीत त्याचा खून केला. ही घटना काटाेल शहरात गुरुवारी (दि. २८) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी त्या विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.
राहुल श्रावण गायकवाड (२७, रा. अण्णा भाऊ साठेनगर, काटाेल) असे मृताचे नाव आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकदेखील काटाेल शहरातील अण्णा भाऊ साठे नगरात राहताे. दाेघांच्याही घराच्या परिसरात लग्न हाेते. त्या लग्नात डीजे लावला हाेता. इतर तरुणांसाेबत दाेघेही कार्यक्रमस्थळी डीजेच्या तालावर नाचत हाेते.
नाचताना राहुल व विधिसंघर्षग्रस्त बालकात भांडण झाले. त्यात राहुलने विधिसंघर्षग्रस्त बालकास आधी मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने स्वत:जवळील चाकू काढून राहुलच्या छातीवर वार केले. ताे जखमी अवस्थेत काेसळताच कार्यक्रमस्थळी खळबळ उडाली. माहिती मिळताच पाेलिसांनीही घटनास्थळ गाठले.
पाेलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत राहुलला जखमी अवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती केले. तिथे गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यातच पाेलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाची नागपूर शहरातील बाल सुधारगृहात रवानगी केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी मृत राहुलचा काका बंडू रामचंद्र गायकवाड (४२, रा. अण्णा भाऊ साठेनगर, काटाेल) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३२६ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे करीत आहेत.
त्या दाेघांमध्ये अंतर्गत वाद
मृत राहुल गायकवाड व विधिसंघर्षग्रस्त बालकाचे घर जवळजवळ असल्याने त्या दाेघांची आपसात चांगली ओळखी हाेती. त्या दाेघांमध्ये छाेट्या माेठ्या कारणावरून नेहमीच भांडणे व्हायची, अशी माहिती त्या भागातील काही नागरिकांनी दिली. कार्यक्रमस्थळी नाचण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्याचे पर्यवसान खुनात झाले.