लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या उमेदवारीसाठी आलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी निवड मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. सुनील केदार हे समर्थकांना घेऊन पोहचले. त्यांनी अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या उमेदवारीला उघड विरोध करीत अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री नितीन राऊत यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. केदारांच्या या भूमिकेला वासनिक समर्थक नेत्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन खटकेही उडाले. वासनिक यांचे दिल्लीतील वजन पाहता केदारांना वासनिक विरोध महागात पडू शकतो, अशी चर्चा बैठकीनंतर काँग्रेस वर्तुळात सुरू झाली.जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड मंडळाची बैठक होती. तीत आमदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार, प्रदेश पदाधिकारी व आघाड्यांच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी आ. सुनील केदार यांनी समर्थकांना शेतकरी भवनातील कार्यालयात बोलावून घेतले व राऊत यांच्या नावाचा आग्रह धरण्याची सूचना केली. नंतर केदार ४२ समर्थकांना घेऊन निवड मंडळाच्या बैठकीत पोहचले. या बैठकीत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांच्यासह समर्थकांनी ठरल्यानुसार राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तक्षशिला वाघधरे, बाबा आष्टनकर, सुरेश खानोरकर, सुरेश पवनीकर, संजय मेश्राम, एस.क्यु. जमा, राष्ट्रपाल पाटील, नाना कंभाले आदींनी वासनिक यांच्याच नावाची शिफारस करण्याची एकमुखी मागणी केली. केदार यांनी निवड मंडळासमोर उघडपणे वासनिक यांच्या उमेदवारीला विरोध करीत राऊत यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. यावर नाना गावंडे यांनी आता लोकसभेची निवडणूक आहे, पक्षांतर्गत मतभेद नको, असे सावरत पुढे विधानसभेचीही निवडणूक आहे, असा सूचक इशारा केदार यांना दिला. यावेळी दोन्ही गटात शाब्दिक खटके उडाले.जिल्हा काँग्रेस कमिटीने यापूर्वीच वासनिक यांना उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव घेतला होता. यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुंबई येथे बोलाविलेल्या बैठकीतही उपस्थित नेत्यांनी वासनिक यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती. राऊत हे नागपूर शहरातील नेते आहेत. त्यांचा ग्रामीण भागाशी फारसा संपर्क नाही. मंत्री असतानही राऊत हे विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातून पराभूत झाले. तिसऱ्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली. नागपुरात गटबाजीला खतपाणी घालण्यात राऊत यांना मोठा वाटा आहे. राऊत हे ग्रामीणमध्ये हस्तक्षेप करून शहरासारखेच ग्रामीणचे वातावरण गढूळ करू पाहत आहेत, असा आरोप वासनिक समर्थकांनी बैठकीनंतर केला. एकूण घडलेला प्रकार पाहता लोकसभेच्या तोंडावर ग्रामीण काँग्रेसमध्येही गटबाजी वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा निवड मंडळाकडे बुधवारी उमेदवारी अर्ज आले. गुरुवारी उमेदवारांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात येऊन शिफारशी केल्या. निवड मंडळातील सदस्यांनीही आपले मत नोंदविले. याचा सविस्तर अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाईल. बैठकीत कुठलाही गोंधळ किंवा गटबाजी झाली नाही.- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस