चाकूच्या धाकावर मागितली खंडणी - संतप्त जमावाने जेरबंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एका सशस्त्र तरुणाने खंडणीसाठी काही वेळ रेशीमबागेतील एका वकिलाच्या घरी चांगलाच गोंधळ घातला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यामुळे तो घाबरला अन् १० हजार रुपये द्या मी निघून जातो, म्हणू लागला. शनिवारी घडलेल्या या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
रेशीमबागेत राहणारे शिरीष लक्ष्मणराव कोतवाल (वय ६०) यांच्या घरी शनिवारी ७.१५ च्या सुमारास एक आरोपी (वय २६) पोहचला. त्यावेळी कोतवाल दाम्पत्य घरात होते. आरोपीने कोतवाल यांना चाकूचा धाक दाखवून १० हजाराची खंडणी मागितली. मला पैसे द्या, मी काही करणार नाही, असे आरोपी म्हणत होता. दरम्यान, त्याच्या हातात चाकू असल्यामुळे घाबरलेल्या कोतवाल दाम्पत्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. ते पाहून आरोपी गोंधळला. त्याला पकडून जमावाने सक्करदरा पोलिसांना माहिती कळविली. दरम्यान, वकिलाच्या घरी दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाले. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ॲड. कोतवाल यांनी आपण आरोपीला ओळखत नसल्याचे सांगून यापूर्वी कधीही त्याच्याशी संपर्क आला नाही, असेही सांगितले. त्यात आरोपी वेडसर वाटत असल्याने तक्रार देण्याचे टाळण्यात आले.
मात्र, आज सकाळी वरिष्ठ पातळीवरून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे रविवारी ॲड. कोतवाल यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी खंडणी मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
आधी सोडले, आता शोधाशोध
सूत्राच्या माहितीनुसार, आरोपी वेडसर चाळे करीत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध शनिवारी तक्रार देण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आरोपीला दमदाटी करून सोडून दिले. आज मात्र गुन्हा दाखल झाल्याने आता सक्करदरा पोलिसांची आरोपीला शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली.
---