कमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी चार गुंडाच्या तहसील पोलिसांनी मुसक्या बांधल्या त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुक्तार (रा. ताजबाग), सक्षम प्रेमनाथ मौंडेकर (रा.गोळीबार चौक), वैभव राजू वाघेला (रा. मोमिनपुरा) आणि सोनू ओमप्रकाश साखरे (रा.ज्योती नगर खदान) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहेत. तहसील पोलिसांचे पथक बुधवारी रात्री गस्त करत असताना त्रिपिटक बौद्ध विहार जवळच्या अंधाऱ्या परिसरात उपरोक्त आरोपी संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिकडे धाव घेतल्याचे पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच पैकी चौघांना पोलिसांनी पकडले. एक पळून गेला. पकडलेल्या आरोपीकडून चाकू, लाकडी दांडा. नायलॉनची दोरी जप्त करण्यात आली. पळून गेलेल्या आरोपीचे नाव संजोग लीलाधर होले (रा. टिमकी) आहे.
पोलीस उपायुक्त लोहित मतानी, ठाणेदार जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बळीराम परदेशी, हवालदार प्रमोद शनिवारी, लक्ष्मण शेंडे, शैलेश दाभोले, शंभुसिंग किरार, शेख नजीर, यशवंत डोंगरे, पंकज डबरे, कृष्णा चव्हाण, गगन यादव अनिल चतुर्वेदी, पुरुषोत्तम जगदाळे, रुपेश सहारे आणि रंजीत बावणे आदींनी ही कामगिरी बजावली.
घरफोडीचे गुन्हे उघड
पोलीस ठाण्यात आणून आरोपींची चौकशी केली असता आरोपी सक्षम मौंदेकर याने त्याच्या साथीदारासोबत अजनी आणि हुडकेश्वर मध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघड होऊ शकतात, अशी माहिती ठाणेदार जयेश भांडारकर यांनी दिली आहे.
---