राहुल गोवर्धन : रामटेकच्या ‘अॅडव्हेंचर व्हिलेज’मध्ये मिळणार धडेनागपूर : नव्या पिढीला साधे सरळ, ऐशोआरामाचे जीवन हवे आहे. त्यामुळे सैन्य दलाकडे त्यांचा ओढा कमी होत असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील साहसी गुण विकसित करण्यासाठी रामटेक येथील ‘अॅडव्हेंचर व्हिलेज’मध्ये त्यांना सशस्त्र सैन्य अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती सेवानिवृत्त कर्नल राहुल गोवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.रामटेक येथील ‘अॅडव्हेंचर व्हिलेजमध्ये विविध वयोगटासाठी सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे, सेवानिवृत्त कर्नल राहुल गोवर्धन लष्करी कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही अधिकारी भारतीय सशस्त्र सेनेत एनडीए, सीडीएस, एसएसबीमध्ये मुलाखत देऊन अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन करतील. सैन्य अधिकारी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना तात्या टोपेनगर येथील ‘फोर्सेस फाऊंडेशन’मध्ये ‘इनडोअर ट्रेनिंग’ देऊन रामटेकच्या ‘अॅडव्हेंचर व्हिलेज’मध्ये ‘आऊट डोअर’ प्रशिक्षण देतील. यात ट्रॅकींग, पॅरासेलिंग, रोप कोर्स, आॅब्स्टॅकल कोर्स, रॉक क्लायबिंग, रायफल शुटींग, आऊट डोअर कॅम्पिंग, वॉटर स्पोर्टस्च्या माध्यमातून नेतृत्व, आत्मविश्वास, शिस्त, सांघिक यश या गुणांचा विकास करण्यात येईल. याशिवाय भारतीय सेना, नौसेना, वायुसेनेत अधिकारी होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. रामटेकचा परिसर घनदाट जंगल व निसर्गरम्य तलावाने वेढलेला आहे. त्यामुळे तेथे सैन्य दलातील सर्व घडामोडींचे प्रशिक्षण देण्यास सोयीचे ठरणार असल्याचे गोवर्धन यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त कर्नल महेश देशपांडे, सीएसी आॅलराऊंडरचे अमोल खंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सशस्त्र सैन्य अधिकारी होण्यासाठी देणार प्रशिक्षण
By admin | Published: October 29, 2014 12:40 AM