‘गेम’ की दरोडा : चौकशी सुरू नागपूर : गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास धंतोली पोलिसांनी सशस्त्र गुंडांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवारी, मिरची पावडर जप्त केले. हे गुंड कुणाचा गेम करण्यासाठी निघाले होते की दरोडा घालण्यासाठी त्याची चौकशी सुरू आहे. अभिषेक चंद्रशेखर अहेरे (वय १९, रा. काशीनगर, अजनी), रोहित संदीप दुधे (वय २२, रा. रामेश्वरी अजनी), आकाश अंबादास कंगाली (वय २१, रा. तकिया धंतोली), रोहीत ताराचंद गेडाम (वय १९, रा. तकिया धंतोली), बादल धनराज भलावी (वय १९, रा. तकिया धंतोली) आणि सचिन दुर्गेश उईके (वय १९, रा. तकिया धंतोली) अशी या गुंडांची नावे आहेत. काँग्रेसनगर गार्डनच्या समोर सशस्त्र गुंड गुन्हा करण्याच्या तयारीत बसले आहे, अशी माहिती धंतोली पोलिसांना मिळाली. त्यावरून धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजराम मेश्राम, हवलदार महादेव शेटे, सुनील खेरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपींना गराडा घातला. त्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून पोलिसांनी तीन तलवारी, लाकडी दांडा, मिरची पावडर, दोरखंड, मोबाईल आणि मोटरसायकल जप्त केली. अटक करण्यात आलेले अनेक जण कुख्यात गुंड आहेत. त्यामुळे ते कुणाचा गेम करण्याच्या तयारीत होते की दरोडा घालण्याच्या, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. त्यासाठी अजनी पोलिसांकडून आरोपींचा रेकॉर्ड मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सशस्त्र गुंडांची टोळी जेरबंद
By admin | Published: December 25, 2015 3:44 AM