नागपूर : कामठीत जबलपूर मार्गावर शस्त्र घेऊन गुंडांनी एका फार्म हाऊसवर हल्ला चढविला. हवेत गोळीबार करून त्यांनी गोंधळ घातला. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. २४ तासांनंतरही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही.
जबलपूर मार्गावर आवंडीत यशपाल शर्मा यांची शेती आहे. शेतात फार्म हाऊस आहे. शर्मा आपली पत्नी आणि मुलासह येथे राहून शेती करतात. त्यांच्यासोबत बाहेरील मजूर भाड्याने राहतात. बुधवारी रात्री १० वाजता शर्मा परिवार आपल्या खोलीत होता. यावेळी आठ ते दहा गुंड फार्म हाऊसमध्ये आले. सर्वांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. फार्म हाऊसजवळ पोहोचताच त्यांनी तीन ते चार वेळा हवेत गोळीबार केला.
गोळीबाराचा आवाज ऐकून शर्मा आणि मजूर जागे झाले. शर्मा यांच्या पत्नीने आवाज देऊन मजुरांना बाहेर जाऊन पाहण्यास सांगितले. तीन-चार मजूर बाहेर निघून फार्म हाऊसच्या व्हरांड्यात आले. त्यांना पाहून आरोपी फार्म हाऊसचे गेट ओलांडून आत येत होते. त्यांच्याजवळ बंदूक आणि तलवारी होत्या. त्यांना पाहून घाबरलेले मजूर परतले आणि खोलीत लपले. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. आरोपी मजुरांच्या खोलीजवळ पोहोचले. त्यांनी मजुरांना शिवीगाळ करून दार उघडण्यास सांगितले. मजुरांनी प्रतिसाद न दिल्यामुळे लाथा मारून त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मजूर घाबरले. दरवाजा उघडण्यात यश न आल्यामुळे आरोपींनी शर्मा यांच्या जीपची तोडफोड करून ते फरार झाले.
शर्मा यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कामठी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोपी लूटमार किंवा दरोड्याच्या हेतूने आले होते तर त्यांनी हवेत गोळीबार का केला? शर्मा परिवार किंवा इतर कोणावरही हल्ला करण्यासाठी आले होते तर त्यांनी हल्ला न करताच पळ का काढला? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शर्मा यांचे फार्म हाऊस निर्जनस्थळी आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.