नागपूर : कृषी बिलाविरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कडक सुरक्षेच्या उपाययोजना पोलिसांनी केल्या आहेत. संपकाळात गडबड होण्याची शक्यता गृहीत पोलिसांनी संवेदनशील क्षेत्रामध्ये बंदोबस्त लावला आहे. संपकर्त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षात घेता नागपूर आणि अमरावती मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलकांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संघटना आणि त्यांच्या जुळलेले समर्थकही संपाच्या समर्थनात उतरले आहेत. शहरातील ट्रान्सपोर्ट संघटनांनीही संपाला समर्थन दिले आहे. बंदकाळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अपर आयुक्त, उपायुक्त, एसीपी, निरीक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी बंदोबस्तावर आहेत. बळजबरीने दुकाने बंद करणे किंवा गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठीही पोलिसांनी व्यवस्था केली आहे. पोलीस आयुक्त, तीन अपर आयुक्त आणि सर्व उपायुक्तांसोबत स्ट्रायकिंग फोर्स देण्यात आली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षामध्ये चार आरसीपी दल तैनात करण्यात आले आहेत. एक क्यूआरटी दलही तैनात आहे. पोलीस मुख्यालयात ६० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. गोंधळ होताच त्यांना संबंधित ठिकाणी पाठवले जाईल. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर आणि विशेष शाखेचे एपीआय तसेच पीएसआय यांचे चार दल बनविण्यात आले आहेत. क्राईम ब्रँचच्या युनिट ३, ४ व ५ मध्ये आणि आर्थिक गुन्हे शाखेत स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर निगराणी ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. संपाला समर्थन देणाऱ्या वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनाही शांतपणे बंद पाळण्याचे आवाहन केले. वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी कामठी मार्गावर गोळा होणार आहेत. त्यांनी शांततापूर्ण मार्गाने संपाचे समर्थन करण्याचे आश्वासन दिले आहे.