लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत छोडो आंदोलनातील सशस्त्र क्रांतिकारक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांचे धंतोली येथील निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षाचे होते. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा देशपांडे हे नागपुरातील सशस्त्र क्रांतीचा अखेरचा जिवंत पुरावा होते.
राजा देशपांडे यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. वयाच्या सतराव्या वर्षी ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी धंतोली येथील घरातच बंगालच्या परिमल घोष यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तो बॉम्ब इंग्रजांवर टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक झाली. दोन वर्षे खटला चालल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. इतिहासात तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून नोंद आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, स्वातंत्र्यप्राप्तीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या सोहळ्यात त्यांचा भारत सरकारने ताम्रपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, निवृत्त न्यायमूर्ती अजित देशपांडे, रणजी क्रिकेटपटू व मुंबई क्रिकेट क्लबचे सदस्य अनिल देशपांडे, उद्योजक संजय देशपांडे ही तीन मुले, दीपा खांडेकर ही मुलगी असा परिवार आहे. ४ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती.