नागपूर : रेल्वे गाड्यांसोबत रेल्वे स्थानकांवर वाढलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) नागपूरसह विदर्भातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. गाडी आल्यानंतर आणि सुटताना प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक गर्दी करतात. अशा वेळी संधी साधून कुणी अनुचित प्रकार करू नये म्हणूनही आरपीएफच्या मदतीने जीआरपी बंदोबस्त करीत आहे.
नागपूर रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या (एसपी, जीआरपी) अधिकार क्षेत्रात बुलडाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्हे येतात. या कार्यक्षेत्रात जीआरपीची नागपूर, गोंदिया, इतवारी, वर्धा, बडनेरा आणि अकोला असे सहा रेल्वे पोलिस स्टेशन आहेत. तर, या रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भंडारा, नागभिड, अजनी, बल्लारशाह, अमरावती, वाशिम आणि मूर्तिजापूर या सात आऊटपोस्ट (चाैक्या) आहेत. सध्या सर्वच भागातून अयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे बहुतांश रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली असून जीआरपीची जबाबदारीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे स्थानकावर अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रेल्वे गाडी फलाटावर येताना आणि सुटताना प्रवासी आणि त्याचे नातेवाईक गर्दी करतात. अशा वेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तैनात करण्यात आले असून, आलटून पालटून रेल्वे स्थानकाचा कानाकोपरा तपासला जात आहे. प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची नियमित तपासणी केली जात आहे.
साध्या वेषातील कर्मचाऱ्यांची गस्तरेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) २४ तास डोळ्यात तेल घालून रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर बंदोबस्त करीत आहेत. त्यांच्या मदतीला श्वान पथकेही आहेत. दुसरीकडे गर्दीत साध्या वेषातील पोलीस कर्मचारीही प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रेल्वेचे पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दिली आहे.