नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर आणि भारताचे हृदयस्थळ म्हणून देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या प्रगतीचा माहिती आढावा ऐकून अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान चांगलेच प्रभावित झाले. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान पाशिनयान, त्यांची पत्नी अॅना हाकोबयान, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच पत्रकारांसह २४ जणांचे प्रतिनिधीमंडळ विशेष विमानाने आज दुपारी ४.१० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर ते येथे तब्बल पावणेदोन तास थांबले होते.युरोपमधील डोंगराळ भागात अर्मेनिया हा छोटासा देश आहे. या देशाचे पंतप्रधान आपल्या प्रतिनिधी मंडळासह अनोई(व्हिएतनाम)ला जाण्यासाठी निघाले होते. राजशिष्टाचारानुसार, त्यांच्या दौऱ्याची कल्पना भारतीय सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती. त्यांच्या विशेष विमानात नागपूरच्या विमानतळावर इंधन भरले जाणार, याबाबतही पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यानुसार, विमानतळ सुरक्षा प्रशासन आणि नागपूर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दुपारी २ वाजतापासून नागपूर विमानतळाच्या सभोवताल (बाहेरच्या भागात) सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. आतमध्ये नेहमीप्रमाणे सीआयएसएफच्या जवानांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी पंतप्रधान पाशिनयान यांचे विशेष विमान नागपूर विमातळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे उपस्थित होते.पंतप्रधान पाशिनयान यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अॅना हाकोबयान, विदेश मंत्रालयाचे उपमंत्री अव्हेट अॅडोन्टस, उच्च तंत्र उद्योगमंत्री हाकोब अर्शाक्यान, राजदूत आणि पत्रकारांसह २४ जणांचे प्रतिनिधी मंडळ होते. जिल्हाधिकारी मुदगल आणि पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या सर्वांची खास व्यवस्था केली. येथील आदरातिथ्याने भारावलेले पंतप्रधान पाशिनयान आणि पत्नी अॅना यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांशी दिलखुलास चर्चा करून नागपूरच्या प्रगतीबाबतचा आलेख जाणून घेतला. यांच्याकडून त्यांनी नागपूरची प्रशासकीय रचना, प्राप्तीकरांचे स्रोत जाणून घेतले. प्रशासनातर्फे उपराजधानीत राबविल्या जाणाºया विकास आणि लोकाभिमुख उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी मुदगल यांनी त्यांना दिली. तर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्यांना येथील गुन्हेगारीचे स्वरूप आणि कम्युनिटी पुलिसिंगबाबत माहिती दिली. दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी नागपूर विमानतळावर आलेले पंतप्रधान पाशिनयान आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ सायंकाळी ६ पर्यंत विमानतळावर होते. दरम्यानच्या कालावधीत विमानात इंधन भरून घेतल्यानंतर अनोई (व्हिएतनाम)कडे जाण्यासाठी पंतप्रधान पाशिनयान आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने येथून दिल्लीकडे प्रयाण केले.पुन्हा पाच दिवसांनी येणारपंतप्रधान पाशिनयान आणि त्यांची पत्नी अॅना यांनी विमानतळावर चर्चेदरम्यान सॅण्डविच तसेच चहाचा आस्वाद घेतला. येथील एकूणच आदरातिथ्याने ते एवढे भारावले की ९ जुलैला आपण परत नागपुरात येऊ त्यावेळी आणखी चर्चा करू, असे म्हणत पंतप्रधान पाशिनयान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा निरोप घेतला.