लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशसेवेत असलेल्या एका लष्करी जवानाच्या बँक खात्यातून एका भामट्याने ५४,५०० रुपये काढून घेतले. १ मे रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास हा फसवणूकीचा गुन्हा घडला. प्रशांत एकनाथराव अमृते (वय ३६) असे तक्रारदार जवानांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुरुवारी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.अमृते सेनापतीनगर, दिघोरी परिसरात राहतात. ते ११ आसाम रायफल मध्ये सेवारत असून सध्या ते आसाममधील हाफलोनमध्ये कर्तव्यावर आहेत. स्टेट बँकेच्या सक्करदरा शाखेत त्यांचे व त्यांच्या पत्नी अनिता यांचे संयूक्त खाते आहे. या खात्याचे दोन स्वतंत्र एटीएम कार्ड असून त्यांचे नंबर तसेच पीन कोडही वेगवेगळा आहे. याच खात्यात त्यांचे मासिक वेतन जमा होते. झालेल्या व्यवहाराची माहिती त्यांना एसएमएस द्वारे मिळते. १ मे च्या दुपारी त्यांना बँकेतर्फे दोन मेसेज आले. त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये विड्रॉल केल्याचे तसेच १४, ५०० रुपये ट्रान्सफर झाल्याचे त्यांना कळाले. अमृते यांचे एटीएम कार्ड त्यांच्याजवळच होते. त्यामुळे त्यांनी बँक अधिका-यांशी संपर्क केला. आरोपीने बनावट कार्ड तसेच त्यांचा पीन कोड चोरून ही रक्कम काढल्याचे बँकेच्या अधिका-यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे अमृते यांनी सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ४२० भादंवि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० चे सहकलम ६६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.