लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्मीत सेवारत असलेल्या अधिकाऱ्याच्या बहिणीची सायबर गुन्हेगाराने फसवणूक केली. कॅन्सल झालेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती घेऊन आरोपीने त्या खात्यातून २.८७ लाख रुपये काढून घेतले. १४ जुलैला घडलेली ही बनवाबनवी लक्षात आल्यामुळे त्यांनी भावाच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
गाैरव दिलीप तितरमारे (वय २८) हे सोनेगावला विमानतळानजीकच्या ममता को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहतात. ते भारतीय स्थल सेना मथुरा येथे कार्यरत आहेत. त्यांची बहीण श्रद्धा समीर तिजारे (वय ३०) भावनगर, गुजरात येथे राहतात. गाैरव यांनी आपल्या बहिणीला आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करायला परवानगी दिलेली आहे. तिजारे यांनी मे २०२० मध्ये आयआरसीटीसी या वेबसाईटवर जाऊन नागपूर ते भावनगर रेल्वेचे तिकीट बुक केले होते. कोरोनामुळे ते तिकीट कॅन्सल झाले. मात्र, तिकिटाची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे श्रद्धा तिजारे यांनी पुन्हा गुुगलवर साईट ओपन करून तिकिटाबाबत विचारणा केली. यावेळी पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या कोणत्या बँक खात्यातून जास्त आर्थिक व्यवहार होतात, असा प्रश्न केला. श्रद्धा तिजारे यांनी आरोपीला स्टेट बँकेच्या जयप्रकाशनगर शाखेचा क्रमांक दिला. आरोपीने १४ जुलैला दुपारी २ च्या सुमारास त्या खात्यातून २ लाख ७८ हजार २२९ रुपये आपल्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. अलीकडे ही बनवाबनवी लक्षात आली. श्रद्धा यांनी भाऊ गाैरव यांना ही माहिती दिली. गाैरव यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी सोनेगाव ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.