नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अद्याप शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती न झाल्याने विविध विभागांवर प्रचंड ताण आलेला आहे. यामुळे परीक्षा विभागाच्या कामावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. पदभरती करण्याचे सोडून विद्यापीठाने यावर वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची प्रशासन सेवा घेणार आहे. यासंदर्भात त्यांना पत्रदेखील देण्यात आले असून काही अधिकारी रुजूदेखील झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सद्यस्थितीत विद्यापीठाचा परीक्षा विभाग पूर्णपणे ढासळला आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ही बाब मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. २०१२ पासून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रच मिळालेले नाही. अशा स्थितीत पदवी प्रमाणपत्राचे नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करणे ही परीक्षा विभागासमोरील कसरत ठरणार आहे. या कामासाठी सध्याचे अधिकारी लावले तर परीक्षांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रशासनाने सेवानिवृत्त व सक्षम अधिकाऱ्यांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १० ते १२ सेवानिवृत्त कर्मचारी परीक्षा भवनात विविध आघाड्यांवर मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष कामदेखील करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी) पदभरती हाच उपायविद्यापीठाच्या महत्त्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. विद्यापीठात अनेक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी दिली तर ते चांगल्या पद्धतीने कामदेखील करू शकतात व त्यांना अनुभवदेखील मिळू शकतो. परंतु अगोदरच त्यांच्यावर मोठा ताण असल्याने ते या मोठ्या अनुभवाला मुकत आहेत. शिवाय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनावरदेखील मोठी रक्कम खर्च होणार आहे. याचा ताण विद्यापीठाच्या जनरल फंडावर पडणार आहे. रिक्त पदे भरणे हाच यावर उपाय असल्याचे मत एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.निवडणुकादेखील सेवानिवृत्तांच्याच मार्गदर्शनातविद्यापीठातील विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणुका होणार आहेत. याकरिता विद्यापीठाला अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. या निवडणुकांसाठी सहायक म्हणून विद्यापीठातील लोकांना संधी न देता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवा घेण्यात येणार आहे. याकरिता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांचे निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव व सहायक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव (सा.प्र.) व उपकुलसचिव (विद्या शाखा) हे काम पाहणार आहेत. परंतु निवडणुकांची वास्तविक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे व माजी उपकुलसचिव श्रीकृष्ण भारंबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, यादी तयार करणे इत्यादी निवडणुकींशी संबंधित कामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
विद्यापीठात सेवानिवृत्तांची फौज
By admin | Published: April 18, 2015 2:42 AM