नागपूर : सातत्याने मागणी होत असलेल्या कोरोनावरील बूस्टर डोसला सोमवारपासून सुरुवात झाली. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा केली जात होती. परंतु, शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येला रोखण्यासाठी बूस्टर डोसची मोहीम १० जानेवारीपासून हाती घेण्यात आली. यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’, ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ व सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात आले. या मोहिमेची सुरुवात पाचपावली येथील स्त्री रुग्णालयातून पालकमंत्री नितीन राऊत यांनी बूस्टर (प्रिकॉशन) डोस घेऊन केली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे यांनीही लस घेतली. जिल्हाधिकारी विमला आर. मनपाचे अतिरीक्त आयुक्त दीपक कुमार मीना प्रामुख्याने उपस्थित होते.
बूस्टर डोससाठी शहरात मनपाने २९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन, तर ११९ केंद्रांवर कोविशिल्ड असे एकूण १४८ तर, ग्रामीणमध्ये १२६ केंद्रावर कोविशिल्ड, तर ६६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन असे एकूण १९२ केंद्रांवर बूस्टर डोससह पहिल्या व दुसऱ्या डोसची सोय केली.
-सहव्याधी ज्येष्ठांची संख्या कमी
६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. दुसरा डोस साधारण एक महिन्यानंतर एप्रिल महिन्यात घेण्यात आला. यामुळे दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण न झालेल्या ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. यामुळे आज बहुसंख्य केंद्रांवर ज्येष्ठांची संख्या कमी पाहायला मिळाली.
पालकमंत्र्यांनीही घेतला बूस्टर डोस
पाचपावली स्त्री रुग्णालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोव्हॅक्सिन लसीचा बूस्टर डोस घेतला. आरोग्य सेवक गटातून झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे यांनी बूस्टर डोसटची लस घेतली. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे पात्र नागरिकांनी बूस्टर डोस घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
-सकाळी रांग दुपारी शुकशुकाट
सकाळी शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी हेल्थ वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व सहव्याधी असलेल्या ज्येष्ठांची रांग दिसून आली. परंतु, दुपारनंतर बहुसंख्य केंद्रांवर बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती. मात्र, १५ ते १८ वयोगटांतील लसीकरणाला बऱ्यापैकी गर्दी होती.
-बूस्टर डोस घेणाऱ्यांना पाठविले परत
गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात बूस्टर डोसची सोय आहे. विशेष म्हणजे, येथे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनची दोन सेंटर आहेत. परंतु, १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याने व त्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे या लसीच्या बूस्टर डोससाठी सकाळी आलेल्या लाभार्थ्यांना दुपारी २ नंतर बोलविण्यात आले. परंतु, तेव्हाही गर्दीच असल्याने त्यांना परत पाठविण्यात आले. यामुळे अनेकांनी मनपाच्या नियोजनावर संताप व्यक्त केला.
- असे झाले ग्रामीणमध्ये बूस्टर लसीकरण
हेल्थकेअर वर्कर्स : ४८४
फ्रंटलाईन वर्कर्स : ६९
सहव्याधी ६० वर्षांवरील : १०८