लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांच्या कारवाईतून सटकण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांना देणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सिराज नागपुरातील कुख्यात बुकी असून त्याचा लॉटरीचाही व्यवसाय आहे. ट्रॅव्हल्स आणि केबलचा व्यवसाय दाखवून तो आपल्या अवैध धंद्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करतो. चार आठवड्यापूर्वी त्याच्या साथीदारांना क्रिकेट बेटिंग करताना पोलिसांनी पकडले होते. त्या गुन्ह्यात सिराज फरार होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल गुन्हे शाखेतून माहीत पडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सिराजच्या तातडीने मुसक्या बांधण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनचे प्रभारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी गुरुवारी रात्री आपल्या पथकामार्फत कुख्यात सिराजला पकडले. त्याला ठाण्यात आणल्याचे कळताच पोलीस आयुक्त स्वतःच गणेशपेठ ठाण्यात पोहोचले. त्यांनी स्वतःच तेथे सिराजची खबरबात घेतली.
दरम्यान, सिराजचे अनेक पोलिसांसोबत मधुर संबंध आहेत. काही दलालही त्याने पेरून ठेवले आहेत. पोलीस आयुक्तांची नजर असल्यामुळे सिराजची कुंडली बाहेर काढली जाऊ शकते, असे सिराजला कळले होते. त्यामुळे साथीदारांच्या माध्यमातून सिराजने कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या मदतीने सिराजने पोलीस कोठडीतून सटकण्याचा डाव टाकला होता; मात्र पोलीस आयुक्तांनी त्याच्या प्रमाणपत्रावर विश्वास न ठेवता सिराजची शुक्रवारी टेस्ट करून घेतली. त्यात तो निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सिराजविरुद्ध कोरोना संसर्गाच्या धोक्याचा आणि बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी सिराज आणि त्याला बनावट कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र मिळवून देणारे गजानन कोहाडकर तसेच जावेद या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांना शुक्रवारी रात्री अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
---
नवीन घडामोडीची शक्यता
कुख्यात सिराज शेखचे अवैध धंदे आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात आणखी काही मोठ्या घडामोडी घडू शकतात.
पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर तपास करीत आहेत.
---