नागपूर : रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना बेड मिळविण्यासाठी फरफट सहन करावी लागते आहे. अडचणीत असलेल्या समाजबांधवांना अशा कठीण प्रसंगी तातडीची मदत मिळावी, यासाठी कामठी राेडवरील नागलाेक महाबाेधी विहारात २४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. समता सैनिक दल, त्रिरत्न बाैद्ध महासंघ तसेच दि बुद्धा मल्टिस्पेशालिटी चॅरिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुढाकार घेण्यात आला आहे.
नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने विहाराच्या बाेधिचित्त सभागृहात रुग्णालयासारखी व्यवस्था करण्यात आली आहे. काेराेनाची साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळावा, या उद्देशाने सामाजिक जाणिवेतून ही व्यवस्था करण्यात आल्याचे दलाच्या ॲड. स्मिता कांबळे यांनी सांगितले. ह्युमन मिला फाऊंडेशन, ब्लू व्हिजन फाेरम, स्कॅन, आंबेडकर असाेसिएशन ऑफ नाॅर्थ असाेसिएशन आदी आंबेडकरी संघटनांकडून या कार्यासाठी सहकार्य मिळाले आहे. केवळ रुग्णालय नाही, तर येथे डाॅक्टर आणि नर्सचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह वैद्यकीय साहित्य उपलब्ध करण्यासाठी समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनानंतर दाेन दिवसांत ३.५० लक्ष रुपयांच्या वर निधी गाेळा झाल्याचे ॲड. कांबळे यांनी सांगितले. काेराेनाकाळात समाजाने अनेक आंबेडकरी विचारवंत गमावले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून ही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यात धम्मचारी तेजदर्शन, विश्वास पाटील, प्रफुल्ल मेश्राम, अजय बागडे, दिशू कांबळे, सतीश शंभरकर, विवेक चव्हाण, पद्माकर लामघरे, राजेश लांजेवार आदींनी सक्रिय भूमिका घेतली आहे.
विविध सामाजिक संघटनांचाही पुढाकार
सिंधू समाजानेही या अडचणीच्या वेळी पुढाकार घेत काेराेना केअर सेंटर म्हणून आपले समाजभवन उपलब्ध केले आहे. याशिवाय अनेक समाजघटक पुढे येत आहेत. विविध समाजाचे अनेक समाजभवन शहरात उभे आहेत. अशा कठीण प्रसंगी मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या समाजभवनात वैद्यकीय व्यवस्था निर्माण केली, तर माेठी मदत समाजबांधवांना हाेईल, अशी भावना अनेक समाज संघटनांनी व्यक्त केली आहे.