लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नागपुरात रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गरज लक्षात घेऊन अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही बेड नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव केले आहे. तसेच पुढील काही दिवसांत ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसा, वास जाणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी, असे आग्रही आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन तीन दिवसात रुग्ण संख्या सातत्याने पाच हजारांच्यावर आहे. शुक्रवारी ही संख्या ६ हजारांवर गेली. अशा परिस्थितीत प्रशासन युद्धस्तरावर नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करीत आहे. यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत संपर्क साधण्यात आला असून, कालपासून काही रुग्ण त्या ठिकाणीदेखील पाठविले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिस्थितीत मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, हॉस्पिटल लता मंगेशकर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणची बेडची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशासनातर्फे येत्या दोन-तीन दिवसांत काटोल, कामठी, मौदा, भिवापूर येथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे दिसताच लगेच चाचणी करा
ग्रामीण भागातील नागरिकांनी थोडेही लक्षण जाणवताच वेळ न दवडता आरोग्य केंद्र गाठावे. चाचणी करावी यामध्ये आधी रॅपिड टेस्ट करावी व नंतर ती नकारात्मक आल्यास आरपीटीसीआर टेस्ट करावी. जिल्हा नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६२६६८ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. बेडची संख्या वाढविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाद्वारे गठित समितीच्याही बैठकी सुरू आहेत. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर या सगळ्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच संसर्गाला प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी लवकर टेस्ट करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.