नागपूर : आसीनगर झोन अंतर्गत मौजा नारा, नारी येथील ३२ मालमत्ताधारकांवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. या मालमत्ताधारकांवर ७ कोटी ६२ लाख ६४ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकित होता. जप्तीची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये रणजीत शिर्के, रामेश्वर शिर्के, बोडे हाऊसिंग एजन्सीचे १३ प्लॉट, कडू लेआऊटमधील २० प्लॉट, कमलेश चौधरी, इंद्रजित सूरी, शांतिदेवी सूरी यांचा समावेश आहे.
जप्तीची कारवाई केलेल्या मालमत्ता धारकांना थकित मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करावा, अन्यथा जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, अशा इशारा झोनचे सहायक आयुक्त हरिष राऊत यांनी दिला. या कारवाईत सहा. अधीक्षक मनिष मालोकर, कर निरीक्षक कुणाल मोटघरे, कर संग्राहक अमरदीप सिपाही, रमन मेश्राम, कर निरीक्षक संजय शिंगणे आदी सहभागी झाले होते.