लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणाऱ्या ५०० विदर्भवाद्यांना अटक केली.विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विदर्भातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारला होता. नागपूर शहरात या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालय, व्यापारी प्रतिष्ठाने, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंददरम्यान सुरू होती. सकाळी ११ वाजतापासून आंदोलकांनी शहरातील विविध चौकात जमा होऊन वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ नारेबाजी सुरू केली. परंतु, पोलिसांनी विदर्भवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तुकडोजी चौक, व्हेरायटी चौक, शहीद चौक, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा चौक, महाल, झाशी राणी चौक आदी ठिकाणी विदर्भवाद्यांनी नारेबाजी सुरू करताच पोलिसांनी लगेच त्यांना अटक केली. यात पोलिसांनी व्हेरायटी चौकात आंदोलक समजून सर्वसामान्य नागरिकांनाही अटक केली. परंतु आंदोलनाशी संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या ४० महिला आणि ४५० पुरुषांना दाभा आणि पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. आंदोलनात अॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, हिमांशु देवघरे, राजकुमार नागुलवार, राजू झोटिंग, सुरेश वानखडे, विजया धोटे, राजेंद्रसिंग ठाकरे, शीला देशपांडे यांच्यासह समितीच्या ५०० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता आंदोलकांची सुटका करण्यात आली.
विदर्भाचा आवाज बुलंद करणाऱ्या ५०० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:34 PM
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणाऱ्या ५०० विदर्भवाद्यांना अटक केली.
ठळक मुद्देपोलिसांची दडपशाही : शहरात विदर्भ बंदला अल्प प्रतिसाद