लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहरातील बावर्ची रेस्टॉरेंटचे संचालक समीर त्रिपाठी यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. त्यांना नंतर कोर्टात हजर करण्यात आले.समीर त्रिपाठी यांचे बावर्ची रेस्टॉरेंट नामक हॉटेल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यावसायिक व्यवहारातून समीर त्रिपाठी यांच्याकडे तक्रारकर्त्या व्यावसायिकाचे पाच लाख रुपयांचे देणे होते. ती रक्कम देण्याच्या बदल्यात त्रिपाठी यांनी त्यांना धनादेश दिला. मात्र, खात्यात रक्कम नसल्यामुळे हा धनादेश बँकेत वटला नाही. खात्यात रक्कम नसल्याचे माहीत असूनही जाणीवपूर्वक धनादेश देऊन आर्थिक व मानसिक फसवणूक करण्याचा प्रकार झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकाने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. या पार्श्वभूमीवर, त्रिपाठी यांच्याविरुद्ध न्यायालयातून गैरजमानती वॉरंट निघाला. त्यानुसार, दोन आठवड्यांपूर्वी अंबाझरी पोलिसांनी त्रिपाठी यांना शोधण्यासाठी धावपळ केली होती. मात्र, त्यावेळी ते पोलिसांना मिळाले नाही. आज गुरुवारी सकाळी ९ ते ९.३० च्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कागदोपत्री अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. नंतर त्यांची न्यायालयातून जामिनावर सुटका झाल्याचे अंबाझरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली होती.
नागपुरातील बावर्ची रेस्टॉरेंटच्या संचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:04 AM
खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहरातील बावर्ची रेस्टॉरेंटचे संचालक समीर त्रिपाठी यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देचेक बाऊन्स प्रकरण : हॉटेल व्यावसायिकांत खळबळ