लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : वडिलाेपार्जित शेती अकृषक करण्यासाठी शेतकऱ्याला ६० हजार रुपयाची लाग मागणाऱ्या महसूल सहायक व त्याच्या खासगी मदतनिसाला ५५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सावनेर तहसील कार्यालयात साेमवारी (दि. १४) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राजेंद्र जीवन उबाळे (५२) व शुभम सुभाष साबळे (२३), अशी अटक करण्यात आलेल्या लाचखाेर आराेपींची नावे आहेत. राजेंद्र उबाळे हा सावनेर तहसील कार्यालयात महसूल सहायक म्हणून नाेकरी करीत असून, शुभम त्याचा मदतनीस म्हणून काम करताे. तक्रारकर्ते बाबा फरीदनगर, नागपूर येथील रहिवासी असून, त्यांची कवडस (ता. सावनेर) येथे ०.५६ हेक्टर वडिलाेपार्जित शेती आहे. यातील ०.१० हेक्टर शेती अकृषक (एनए) करण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडे रीतसर अर्ज केला हाेता. त्या अर्जावर कार्यवाहीला सुरुवातही करण्यात आली. मात्र, शुभम साबळे याने राजेंद्र उबाळे याच्या सांगण्यावरून तक्रारकर्त्यास भेटला आणि त्यांना या कामासाठी ६० हजार रुपयाची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
पुढे तडजाेडीअंती हा साैदा ५५ हजार रुपयावर आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यानी ही रक्कम साेमवारी दुपारी सावनेर तहसील कार्यालयात शुभमच्या सुपूर्द केली. त्याचवेळी कार्यालय परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुभमला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही लाच राजेंद्र उबाळे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे सांगितल्याने या पथकाने राजेंद्र उबाळेलाही अटक केली.
याप्रकरणी सावनेर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पाेलीस उपअधीक्षक संदीप जगताप, हवालदार प्रवीण पडाेळे, मंगेश कळंबे, पंकज घाेडके, अनिल बहिरे, हरीश गांजरे, दीपाली भगत, सदानंद सिरसाट यांच्या पथकाने केली.