भिवापूर : अल्पवयीन मुलीला घरी एकटी पाहून आराेपीने तिचा विनयभंग केला. ही घटना भिवापूर नजीकच्या मरुपार पुनर्वसन येथे शनिवारी (दि.१४) दुपारी घडली. दरम्यान मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे.
प्रकाश जनबंधू (६०, रा. भिवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शनिवारी दुपारी १० वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण घरी होत्या. दरम्यान आरोपी हा दुचाकीने तिच्या घरी आला. यावेळी मुलीने आई शेतात गेल्याचे सांगितल्यानंतरही आरोपी घरात शिरला. आमचा पेपर असून आम्ही शाळेत चाललो असे सांगत मुलीने दाराला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीने तिच्याशी शारीरिक गैरवर्तन केले. दोन्ही मुलींनी घाबरून त्यांनी मोठे वडिलांचे घर गाठले. यावेळी आरोपीनेही त्यांचा पाठलाग केला. सायंकाळी मुलीची आई घरी परतल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी भादंवि कलम ३५४ अ, ४५१ सहकलम ८ बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे करीत आहेत.
.....
अल्पवयीन मुलीला पळविले
भिवापूर : अल्पवयीन मुलीला संशयित आराेपीने पळवून नेल्याची घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राेहणा येथे शनिवारी (दि.१४) उघडकीस आली. १७ वर्षीय मुलगी कुणालाही न सांगता घरून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने तिच्या वडिलांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. नागभीड तालुक्यातील कोरंबी येथील २५ वर्षीय तरुण रोहणा येथे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतो. त्याने मुलीला काेणते तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय पालकांनी केला आहे. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.