नागपूर : फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविणाऱ्या महिलेस तहसील पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात तिच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती आहे.
टिनू उर्फ चिकू उर्फ ऋतुजा राजेश जाधव (वय २१, रा. गल्ली नं. २, इंदिरानगर, शितला माता मंदिराजवळ, जाटतरोडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत गुन्ह्यात एका १७ वर्षाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संगीता उमेश क्षेत्रपाळ (वय ४९, रा. चित्रा टॉकीजजवळ, गवळीपुरा) या गुरुवारी १७ मे २०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ६.४५ वाजता फिरायला गेल्या होत्या. तेवढ्यात अॅक्टिवावर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून अॅक्टीव्हाच्या मागे बसलेली मुलगी असल्याचे समजले. अॅक्टीव्हाच्या क्रमांकावरून ही गाडी शोभा सेनासर नंदेश्वर (रा. नागार्जुन कॉलनी, सुगतनगर) यांची असल्याचे समजले. त्यांच्याकडे विचारणा केली असता ही गाडी त्यांच्या घरी किरायाने राहणारी तृतीयपंथी सनम उर्फ परी ऐश्वर्या गजभिये आणि तिला १७ वर्षाचा अल्पवयीन मित्र वापरत असल्याचे समजले. सनमला आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाला विचारणा केली असता बालकाने आपली मैत्रीण ऋतुजासोबत मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी ऋतुजाला अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल, अॅक्टीव्हा गाडी, दोन मंगळसूत्रे असा एकूण १.६४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तहसील पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल तपास सुरु केला आहे.