लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : ट्रकच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तिघांनी ट्रकच्या सुट्याभागाची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विचारणा करताच त्या तिघांनीही ट्रकमालकास मारहाण केली. यातील तिन्ही आराेपीस वाडी पाेलिसांनी गुरुवारी (दि. १९) रात्री अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
उमाकांत शंकर चौधरी (५०, रा. वैष्णवमाता सोसायटी, महादेवनगर, वाडी), रवींद्र विजय यादव (५३) व संदीप रवींद्र यादव (१९) दाेघेही रा. सुराबर्डी, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. अशोक मार्कंडेय शुक्ला (५०, रा. मंगलधाम सोसायटी, शाहू ले-आऊट, वाडी) यांच्याकडे एमएच-०४/सीयू-१०४३ क्रमांकाचा ट्रक आहे. या ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ताे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीतील उमाकांतला बाेलावले हाेते.
उमाकांतने रवींद्र व संदीपच्या मदतीने दुरुस्तीला सुरुवात केली. या तिघांनीही त्या ट्रकमधील बॅटरी, मागचे दाेन टायर व ताडपत्रीची परस्पर विल्हेवाट लावली. हा प्रकार लक्षात येताच अशाेक शुक्ला यांनी त्या तिघांनाही विचारणा केली. त्यामुळे तिघांनीही त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ४०६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आराेपींना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून त्यांनी चाेरून नेलेले ३९ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल सुनील मस्के करीत आहेत.