लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ते वकील आहेत. माझी अडचण समजून घेतील, असे वाटले होते. त्यामुळे चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरलो आणि रकमेची मागणी केली, असा अजब कबुलीजबाब एका आरोपीने आज दिला. डोमेश्वर कावरे (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बालाघाटमधील रहिवासी आहे.
रेशीमबागेत राहणारे ॲड. शिरीष लक्ष्मणराव कोतवाल (वय ६०) यांच्या घरी शनिवारी ७.१५ च्या सुमारास आरोपी कावरे पोहचला. त्याने कोतवाल यांना चाकूचा धाक दाखवून १० हजाराची खंडणी मागितली होती. मला पैसे द्या, मी काही करणार नाही, असे आरोपी म्हणत होता. दरम्यान, त्याच्या हातात चाकू असल्यामुळे घाबरलेल्या कोतवाल दाम्पत्याने त्याचा चाकूचा हात पकडून आरडाओरड केली. त्यामुळे त्यांना थोडीशी जखमही झाली.
आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी आरोपीला पकडून सक्करदरा पोलिसांना माहिती कळविली. पोलीस ठाण्यात कावरेची मध्यरात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. ॲड. कोतवाल यांनी आपण आरोपीला ओळखत नसल्याचे सांगून यापूर्वी कधी त्याच्याशी संपर्क आला नाही, असेही सांगितले. त्यात आरोपी वेडसर वाटत असल्याने तक्रार देण्याचे टाळण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्यावेळी त्याला सोडून दिले. नंतर मात्र वरिष्ठ पातळीवरून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे रविवारी पोलिसांनी ॲड. कोतवाल यांची तक्रार नोंदवून घेत खंडणी मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आरोपीला शोधण्यासाठी सक्करदरा पोलिसांची धावपळ सुरू होती. आज अखेर दुपारी तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करतेवेळी ठाणेदार सत्यवान माने यांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच अजब युक्तिवाद केला.
कावरे मूळचा बालाघाटचा रहिवासी आहे. तो दहावीपर्यंत शिकला आहे. त्याला वृद्ध आईवडील आणि तीन बहिणी आहेत. पूर्वी तो मिहानमध्ये मजुरी करायचा. लॉकडाऊन दरम्यान तो हनुमाननगरात भाड्याच्या खोलीत राहायला आला. मिळेल ते काम करून तो गुजराण करीत होता. पैशाची चणचण भासू लागल्याने शनिवारी रात्री तो चाकू घेऊन निघाला. ॲड कोतवाल यांचे निवासस्थान आणि नाव बघून आत शिरला. कोतवाल यांच्या हातात अंगठ्या बघून त्यांच्याकडून आपल्याला मोठा माल मिळेल नाही तर ते आपली स्थिती समजून घेत आपल्याला १० हजार रुपये देतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी आपल्याला समजून घेतले नाही, असे आरोपी कावरे पोलिसांसमोर कबुलीजबाब देताना म्हणाला.
असा लागला छडा
पोलिसांवर कावरेला अटक करण्यासाठी दडपण होते. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी कोतवाल यांच्या घराजवळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून कावरेच्या घराचा मार्ग पोलिसांना कळला. तो हनुमाननगरात राहत असल्याचे कळाल्याने पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. अखेर बास्केटबॉल ग्राऊंडजवळ कावरे नजरेत पडला अन् पोलिसांनी त्याला जेरबंद केले.