लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : आधीच्या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना पळवून दुसऱ्या राज्यात नेणाऱ्या दाेघांना वाडी पाेलिसांनी अटक केली. त्यांनी पळवून नेलेल्या मुलींना सूचनापत्र देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर न्यायालयाने दोन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी सुनावल्याने दाेघांचीही नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
अमितकुमार रामकिसन सेन (१८) व राहुल लालसिंग पाल (१८) दाेघेही रा. गद्दीगाव, ता. तहरोली, जिल्हा झासी, उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. उत्तर प्रदेशातील एक कुटुंब १५ वर्षापूर्वी वडधामना येथे स्थायिक झाले. त्यांच्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या मध्य प्रदेशातील नातेवाईक मुलीला आराेपीने फाेन करून बाेलावून घेतले व जुन्या ओळखीचा हवाला देत दिल्ली व पुढे हिमाचल प्रदेशात नेले.
त्या मुलीच्या माेबाईलचे लाेकेशन हिमाचल प्रदेशात दाखवित असल्याने वाडी पाेलिसांचे विशेष पथक हिमाचल प्रदेशला गेले. पाेलिसांपासून बचाव करण्यासाठी मुलीचा फाेन वारंवार स्वीच्ड ऑफ, ऑन केला जात असल्याने तपासात अडचणी येत हाेत्या. मात्र, वाडी पाेलिसांनी हिमाचल प्रदेश पाेलिसांच्या मदतीने आराेपींसह मुलींना ताब्यात घेत वाडीला आणले. मुलींना सूचनापत्र देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यायालयाने दाेन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्यांची नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली.