लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणास कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक केली. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान एकूण २८ विविध शस्त्रे आढळून आल्याने ती जप्त केल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. ही कारवाई कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेरपड येथे शनिवारी (दि. ६) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
हर्षल ऊर्फ हरीश संतोष आमधरे (१९, रा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेजवळ, घोरपड, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना हर्षल हातात तलवार घेऊन ड्रॅगन पॅलेस राेडने ओरडत जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी त्याला थांबवून ताब्यात घेतले. एका महिलेने त्याच्या आईसाेबत भांडण केले. त्यामुळे ताे त्या महिलेचा खून करण्यासाठी जात असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी त्याला लगेच अटक केली.
दरम्यान, पाेलिसांनी मध्यरात्री त्याच्या घराची कसून झडती घेतली. यात पाेलिसांनी त्याच्या घरातून दाेन माेठे लाेखंडी चक्र, दाेन त्रिशूळ, सात भाले, आठ लाेखंडी दांडपट्टे, दाेन माेठ्या तलवारी, दाेन लाेखंडी राॅड अशी एकूण २८ घातक शस्त्रे जप्त केली, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक एस. कार्वेकर, नीलेश धोंगडे, पप्पू यादव, अखिलेश राय, मंगेश लांजेवार, तेजराम सराटे, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, राहुल वाघमारे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप भोयर, मनोहर राऊत, नीलेश यादव, अनिल बाळराजे, प्रमोद वाघ यांच्या पथकाने केली.