नागपूर : सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची विक्री करण्यासाठी तेलंगणात पळालेल्या 'बंटी-बबली'सह तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.
सुनील उत्तम रुढे (वय ३२, रा. हिंगेवाडी, दिग्रस, जि. यवतमाळ), माया बाबूराव चव्हाण (वय २८, रा. चंद्रपूर) अशी अपहरण करणाऱ्या मुख्यआरोपींची (बंटी-बबली) नावे आहेत. तर, त्यांचा साथ देणाऱ्या महिला आरोपीचे नाव सुजाता लच्छया गाजलवार (वय ३०) असे आहे. ती आसिफाबाद, तेलंगणा येथे राहते.
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंचेरिया (तेलंगणा) येथील विजया नामक महिलेला बाळ हवे होते. मोठी रक्कम दिल्यास तुला बाळ मिळेल, असे सुजाताने म्हटले होते. साैदा पक्का झाल्यानंतर सुजाताने आरोपी सुनील आणि त्याची प्रेयसी मायाला ४० हजार रुपयांत हे काम दिले. त्यानुसार, आरोपी सुनील आणि मायाने नागपुरात येऊन सावज हेरणे सुरू केले. पीडित भिक्षेकरी दाम्पत्य आणि त्यांचे सहा महिन्याचे बाळ नजरेस पडताच आरोपींनी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि संधी मिळताच गुरुवारी पहाटे ४.१५ वाजता रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चार वरून सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता बाळाच्या आईला जाग आली असता तिला आपले बाळ दिसले नाही. त्यानंतर तिने आरडाओरड करून रेल्वे पोलिसांकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बाळाचे अपहरण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रेल्वे पोलिसांत एकच खळबळ निर्माण झाली. माहिती कळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी लगेच रेल्वे स्थानक गाठून सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. ठाणेदार मनिषा काशिद यांच्या नेतृत्वात अपहृत बाळाचा आणि आरोपींचा छडा लावण्यासाठी ४ पोलीस पथके तयार करण्यात आली.
संत्रा मार्केट गेट जवळून एका ऑटोतून आरोपी बाळाला घेऊन पळाल्याचे कळताच सर्वप्रथम त्या ऑटोवाल्याला पोलिसांनी हुडकून काढले. त्याने आरोपी वर्धा मार्गावरील राजीवनगरात पोहचले, तेथून ते एका कॅबमधून वर्धेकडे गेल्याचे सांगितले. त्यामुळे एका पथकाने पोलिसांनी कॅबचा नंबर शोधून चालकाचे नाव आणि मोबाईल नंबर मिळवला. दुसऱ्या पथकाने आरोपी सुनीलने बियर बारमधून दारूचे बील फोन-पे ने दिले होते. त्यावरून त्याचा नंबर काढून सायबरच्या पथकाने तो ट्रॅक केला. आरोपी तेलंगणाच्या दिशेने गेल्याचे कळताच पोलीस अधीक्षक शिंदे यांनी तेलंगणा पोलिसांशी संपर्क साधून तिकडे नाकेबंदी केली. चाैथे पथक लगेच तिकडे रवाना झाले. तिकडे तेलंगणा पोलिसांच्या मदतीने आरोपी सुनील आणि मायाला चिमुकल्यासह आसिफाबादमध्ये पकडण्यात आले. त्यांनी हे बाळ विकण्याचा साैदा सुजातासोबत केला होता, तिलाही नंतर गुरुवारी रात्री ७.३० ला ताब्यात घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले.
विजयाचा शोध सुरूबाळ तसेच आरोपींना घेऊन पोलीस पथक आज सकाळी नागपुरात पोहचले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बाळाला आईच्या कुशित सोपविण्यात आले. दरम्यान, बाळाला विकण्याच्या हेतूनेच आरोपींनी त्याचे अपहरण केल्याची माहिती उघड झाल्यामुळे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही कलमं वाढवली. आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर घेण्यात आला. बाळ विकत घेण्याचा साैदा करणारी विजया फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.