नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सीताबर्डी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊन अटक केली. समीत ठक्कर (३२) असे त्याचे नाव असून तो नागपुरातील वाठोडा भागात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.आरोपी समीत प्रॉपर्टी डीलर असून त्याचे वडील वाहतूक व्यावसायिक आहेत. तो सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहतो. त्याने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले होेते. सीताबर्डी पोलिसांनी समीतविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुंबईतही गुन्हा दाखल झाला होता. तेथे चौकशी सुरू असताना तो गुजरातमधील राजकोटला पळून गेला. त्याचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांचे एक पथक राजकोटला पोहचले. तेथे त्याच्या मुसक्या बांधून नागपुरात आणण्यात आले. सोमवारी न्यायालयाने ठक्करला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.डोके भडकावणारे कोण?ठक्कर याने ऑगस्टमध्ये तीन वेगवेगळे ट्विट केले आहेत. आरोपीचे सोशल मीडियावरील फाॅलोअर्स बघता त्याला यात आणखी कुणी मदत केली, कुणी डोके भडकविले, राजकोटला त्याला कुणी आश्रय दिला, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधणार आहेत.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 5:30 AM