लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - होंडा सिटी कारच्या छतावर (टपावर) बसून वर्दळीच्या भागात आरडाओरड करत फिरणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी जेरबंद केले. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
वाहन मालक रियांश धुमराज रहांगडाले (वय २७), हर्षल विनोद अबगड (वय २०) आणि ऋषभ देवराव गणवीर (वय २७) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. आरोपी वाहनचालक शाहिद शेख तसेच त्याचे दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वर्दळीच्या भागातून होंडा सिटी कार (एमएच ३१ - सीएस १२२०) च्या टपा (छत)वर काही तरुण बसून कारचालक वेगात वाहन चालवित आहे. आरोपी तरुण वर्दळीच्या भागातून आरडाओरड करीत जात होते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही माहिती एका जागरूक व्यक्तीने नियंत्रण कक्षाला कळविली. आरोपी आणि कारचा फोटोही व्हॉटस्अपवर पाठवला. ते कळताच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना अलर्ट देऊन या कारचालकाला तातडीने ताब्यात घ्या, असे आदेश दिले. त्यानुसार, शहर वाहतूक शाखा सज्ज झाली आणि हवालदार सुभाष अंबादास लांडे, नायक नितीन पंडेल या दोघांनी प्रजापती चाैकाजवळ वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सुसाट वेगाने तेथून सक्करदरा- वाठोडा रिंगरोडकडे पळ काढला. पोलिसांनी या भरधाव कारचा पाठलाग करून अखेर ते पकडले. आरोपी वाहन मालक रियांश रहांगडाले, हर्षल अबगड आणि ऋषभ गणवीर यांना अटक केली तर आरोपी वाहनचालक शाहिद शेखविरुद्ध् गुन्हा दाखल करण्यात आला. शाहिद आणि त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
----