नागपूर : विविध प्रकारच्या अफवांनंतर महाल परिसरातील तणावावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले. समाजकंटकांच्या हल्ल्यात १५ हून अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले. या स्थितीतदेखील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि रात्री उशिरा एक वाजेपर्यंत महाल परिसरात तणावपूर्ण शांतता होती. महाल तसेच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली होती आणि पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सायंकाळी ज्या वेळेला दोन गटांत तणाव झाला, तेव्हा सगळ्यात पहिले जमावाने पोलिसांना टार्गेट केले आणि पंधरांहून अधिक पोलिस कर्मचारी त्यात जखमी झाले. मात्र त्यानंतर अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली आणि पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतरही महाल, चिटणीस पार्क व आजूबाजूच्या परिसरातील गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव होता. काही समाजकंटकांनी गल्ल्यांमधील दुचाकी, चारचाकी वाहने फोडली.
पोलिसांवर वरच्या माळ्यांवरून हल्लाचिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली. अंतर्गत गल्ल्यांमध्ये गेलेल्या पोलिसांवर वरील मजल्यांवरून काही लोकांनी दगड फेकले, त्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. संबंधित भागांमध्ये ‘लोकमत’ने मध्यरात्री जाऊन पाहणी केली असता तेथे एरवी सामान्य घरांजवळ न सापडणारे मोठमोठे दगड, टाइल्सचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे जागोजागी दिसून आले. याशिवाय ज्या पद्धतीने पोलिसांवर वरून दगड कुठे फेकण्यात आले त्यावरून हा ठरवून करण्यात आलेला प्रकार तर नव्हता ना, अशा प्रकारची शंका उपस्थित होत आहे.पोलिस आयुक्त, उपायुक्तही जखमी
कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हेदेखील रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्तदेखील काही प्रमाणात जखमी झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.
शेकडो दुचाकी फोडल्यासमाजकंटकांनी स्थानिक नागरिकांच्या वाहनांनादेखील मोठ्या प्रमाणावर टार्गेट केले. भालदारपुऱ्यातील अनेक गल्ल्यांमध्ये शेकडो दुचाकी खाली पाडून त्यांचे नुकसान करण्यात आले होते. याशिवाय काही दुकानांमध्ये तोडफोड करण्यात आली. एका कूलरच्या दुकानात आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र योग्य वेळी पोलिस पोहोचल्याने तेथे दुर्घटना टळली.
दहा किलोचा दगड आला कुठून?महाल परिसरातील जुन्या हिस्लॉप कॉलेजच्या मागील भागात समाजकंटकांकडून अनेक कारची तोडफोड करण्यात आली. त्यात एम. एच. ४९, ए. एस. ६४४१ या कारमध्ये जवळपास १० ते १२ किलोचा दगड फेकण्यात आला. हा दगड दोन ते तीन जणांशिवाय फेकता येत नाही. यानंतर ती कारही जाळण्यात आली. शिवाय घरही जाळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार पाहता हा सुनियोजित कट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.