लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिमणीपेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला अतिशय गोजिरवाणा ब्ल्यू टेल बी इटर अर्थात निळ्या शेपटाचा वेडा राघू हा पक्षी सध्या विदर्भाच्या मुक्कामी आहे. हा स्थानिक स्थलांतरित पक्षी असून दक्षिण व दक्षिणेतर आशिया खंडातून साधारणत: पावसाळा ते हिवाळा यादरम्यान मध्य भारतात स्थलांतर करतो. दक्षिण भारत ते श्रीलंकेपर्यंत त्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असते.पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी या पक्ष्याबाबत माहिती दिली. याचे शास्त्रीय नाव ‘मेरॉप्स फिलिपिनस’ असे आहे. नावाप्रमाणे सरळ एका रेषेत असलेली त्याची शेपटी व मागचा भाग निळ्या रंगाचा असतो. बाकी शरीर हिरव्या रंगाचे असते. छातीचा भाग तपकिरी आणि चोच लांब व काळी असते. डोळे लालभडक असतात. २३ ते २६ सेंमी लांब असलेला हा वेडा राघू हवेत उडणारे कीटक, किडे, माशा खात असतो. हा समूहाने राहणारा पक्षी असून तारेवर रांगच रांग आपण बघू शकता. आपले भक्ष्य पकडून पुन्हा त्याच ठिकाणी तारेवर येऊन बसतो. एप्रिल ते मेच्या दरम्यान त्याचा विणीचा हंगाम असतो. नदी किंवा तलावाच्या किनाऱ्यावर घरटी करून पिल्ले जन्माला घालतात. गेल्या काही वर्षांत या पक्ष्याची संख्या झपाट्याने कमी झाली असून, केवळ पाच वर्षात ती ८० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केल्याची माहिती लोंढे यांनी दिली.
नागपुरात निळ्या शेपटीच्या वेडा राघूचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 1:02 AM