लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - विदर्भातील पक्षिवैभव नेहमीच चर्चेत असते. विविध प्रकारे पक्षी, फुलपाखरे आणि अधिवासासाठी उपयुक्त वातावरणामुळे हे पक्षिवैभव नेहमीच बहरलेले असते. या वैभवात येत्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा भर पडत आहे. दरवर्षी हमखास येणारे पाहुणे पक्षी पुढील महिन्यात काही दिवसासाठी मुक्कामी येणार असल्याने ही पक्षी अभ्यासक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
विदर्भामध्ये नागझिरा, नवेगाव बांध, मेळघाट, ताडोबा, गोरेवाडा हा परिसर पाहुण्या पक्ष्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. त्यातल्यात्यात गोरेवाडा आणि नवेगाव बांध येथील परिसर या काळात अधिक गजबजलेला असतो. मागील अनेक वर्षांपासून सुणारे ५० ते ५५ प्रकारचे पक्षी येथे येत असतात. या पक्ष्यांचा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा विणीचा काळ असल्याने व येथील वातावरण त्यांच्या अधिवासासाठी पोषक असल्याने ते येथे काही काळासाठी स्थिरावतात.
गोरेवाडा संरक्षित अभयारण्यासह गोरेवाडा तलाव परिसरात २१६ विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यापैकी ५० ते ५५ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांना पक्ष्यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी दरवर्षी येथे उपलब्ध होत असते. या तलावासभोवताल मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असून, स्थलांतरित पक्षी हे या तलावाचे मुख्य आकर्षण आहे. मागील वर्षी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रेस्टेड ग्रेबचे दर्शन घडले होते. यासोबतच रेड क्रेस्टेड पोचार्ड, रुडी सेल्डक, गडवाल, नॉर्थन शॉलर, शेंडीवाला बदक, हूडहूड, रेड स्टार्ट आदी स्थलांतरित पक्ष्यांचेही मागील वर्षी आगमन झाले होते.
गोरेवाडात पक्षी अभ्यासकांसाठी सुविधा
पक्षी निरीक्षकांसाठी वन विकास महामंडळातर्फे गोरेवाडामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बायनाकुलर (दुर्बिण) तसेच पक्षी निरीक्षकांसाठी गाईडची व्यवस्था उपलब्ध आहे. पक्ष्यांच्या नावासह त्यांची वीण, वास्तव्याचे ठिकाण आदी सर्व माहिती या माध्यमातून पक्षी अभ्यासकांना मिळत असते. तलावाच्या सभोवताल बर्ड हायडर लावण्यात आले असून, १० पेक्षा जास्त ठिकाणी बर्ड स्टडीची व्यवस्था आहे. गोरेवाडा परिसरातील समृद्ध वनसंपदेसह तलावावरील पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी अडीच किलोमीटरची नेचर ट्रेल तयार करण्यात आली आहे. सायकलवरूनही नेचर ट्रेल बघण्याची सुविधा आहे.