नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी नागपुरात तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी आगमन झाले. राष्ट्रपती झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेते-अधिकाऱ्यांनी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतींचा रात्री राजभवनात मुक्काम राहणार असून बुधवारी त्या गडचिरोली व कोराडीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून शहराला तीन दिवसांसाठी ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.इ विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक विशाल आनंद हेदेखील उपस्थित होते. विमानतळावरून राष्ट्रपतींच्या ताफ्याने थेट राजभवन गाठले. तेथे त्यांचे खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. आशीष जैस्वाल यांनी स्वागत केले.
आज गडचिरोली व कोराडीतील कार्यक्रमाला उपस्थिती
राष्ट्रपती ५ जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परततील व भारतीय विद्या भवनतर्फे कोराडी येथे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. ६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाजबांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर त्या मुंबईकडे प्रयाण करतील.
--