जितेंद्र ढवळे नागपूर अमूक शाखेत करिअरच्या संधी, तमूक शाखेची पदवी मिळविली की शासकीय नोकरी मिळेल, असे उपदेश पालक आणि विविध कौैन्सिलिंग संस्था देत असल्या तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचा कला (वाङ्मय व समाजविज्ञान) शाखेकडे अधिक कल दिसून आला आहे. या शाखांनंतर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखेला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात वाङ्मय व समाजविज्ञान शाखेत ६४ हजार ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१४-१५ च्या सत्रात यात वाढ झाली. या सत्रात ६९ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी या शाखेत प्रवेश घेतला आहे. नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रात बारावीपर्यंत शिक्षण देणारी कला शाखेची महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी वा हिंदी माध्यमातून होते, त्यांचा या शाखेकडे ओढा आजही कायम असल्याचे कला शाखेच्या माजी अधिष्ठाता डॉ.शरयू तायवाडे यांनी सांगितले. गत तीन वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती कमजोर झाली होती. मात्र या शाखेत करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आजही कायम आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखेत ४४ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. २०१४-१५ मध्ये हे प्रमाण ५१ हजार ५३८ इतके होते. विज्ञान शाखेत समाजविज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या आजही कमी आहे. २०१३-१४ या सत्रात २२ हजार ९८९ तर २०१४-१५ मध्ये २५ हजार ५११ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. विज्ञान शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. २०१३-१४ या सत्रात ४३ हजार २३२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश नोंदविला. २०१४-१५ मध्ये ही संख्या ५१ हजार ८४९ इतकी पोहचली. २०१५-१६ या सत्रातही विद्यार्थ्यांना प्रवेशाचा कल असाच आहे. केवळ घट झाली ती शिक्षण विद्याशाखेत. बी.एड.,एम.एड.कडे पाठ ! मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. जि.प. असो वा महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरीत आहे. यात शिक्षकांची पदभरती नसल्याने शिक्षण विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात दोन वर्षांपासून रिक्त आहेत. २०१३-१४ या सत्रात शिक्षण विद्याशाखेत ९ हजार ६२३ तर २०१४-१५ मध्ये १० हजार ८५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. गृहविज्ञानचे गणित बिघडले गृहविज्ञान शाखेत अधिक करिअर असल्याचे पाच वर्षांपूर्वी बोलले जात होते. त्यामुळे या शाखेला विद्यार्थिनींनी अधिक पसंती दर्शविली होती. मात्र दोन वर्षांपासून या शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१३-१४ या सत्रात या शाखेत २ हजार ३०६ तर २०१४-१५ मध्ये २ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
कला-अभियांत्रिकी काठोकाठ !
By admin | Published: July 27, 2016 2:50 AM