लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘उमलती रंगरेषा’चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनातील चित्र आनंद देणारी आहेत. उमलत्या बालकलावंतांची कला कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातून बालकलावंतांच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. हा मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी येथे व्यक्त केले.सांची बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रंगरेषा अकॅडमी व मीनाक्षी ड्रॉईंग क्लासच्यावतीने ‘उमलती रंगरेषा’ चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रामदासपेठ येथील लोकमत भवनाच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्रा. सदानंद चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी सांची बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उत्तम खोब्रागडे, मीनाक्षी ड्रॉईंग क्लासेसच्या ज्योत्स्ना क्षीरसागर उपस्थित होते.डॉ. निंबाळकर म्हणाले, स्वप्नांच्या अल्पकालीन अशा जगात फेरफटका मारावा, असे हे प्रदर्शन आहे. या चित्रातून रंगाचा वेध घेतल्याचे दिसून येते. पालकांनी मुलांची ही कला जोपासली म्हणूनच हे प्रदर्शन साकारता आले, असेही ते म्हणाले. प्रा. चौधरी म्हणाले, कला शिकवून येत नाही तर ती उपजत असते. कलावंताचे जीवन मिळणे म्हणजे अहोभाग्यच आहे. निसर्गाचा नियम आहे, एक कला मिळाल्यावर दुसरी कलाही येते. रंग, विचार आणि त्यातून सादर झालेल्या कलेचा हा अनोखा कलाविष्कार आहे, असे म्हणत त्यांनी कलेची जोपासना करण्याचे आवाहनही केले. प्रास्ताविक डॉ. लीना निकम यांनी केले. संचालन आयुषी चव्हाण यांनी केले. प्रदर्शनाला रंगरेषा अकॅडमीचे समीर निकम उपस्थित होते.‘उमलती रंगरेषा’ या प्रदर्शनात बालकलावंतांची ८३ चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन १७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात वैष्णवी यादव, श्रेयांष तलमले, प्रेम हटवार, पीहू, निशिता, उत्कर्ष गायधने, युक्ता हनुमंते, श्रृती पिझरकर, रुपल गिरीधर, निधी शर्मा, मुस्कान शर्मा, राणी, मानव सालोडकर, एकता ढेंगे, परी राठी, रोहित खोब्रागडे, साची खोब्रागडे, नेहा कोटांगळे, तनीष निकम, तिजारे, व्हेली नानवटे, हिमांशी आदी कलावंतांच्या चित्रांचा समावेश आहे.