लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक राष्ट्र, एक संविधान आणि एक नागरिक हा देशाला एका धाग्यात जोडण्याचा सोपा मार्ग आहे. राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेतून जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात आले आहे. भविष्यात देशाला अखंड राखून आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी व्यक्त केले.जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या वतीने चिटणवीस सेंटरमध्ये ‘कलम ३७० नंतर जम्मू-काश्मिरातील स्थिती’ या विषयावर बुधवारी सायंकाळी अरुण कुमार यांचे व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर स्टडी सेंटरच्या अध्यक्ष मीरा खडक्कार, सचिव अभिनंदन पळसापुरे होते. अरुण कुमार म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पातून उचललेले हे पाऊल आहे. देशपे्रमातून या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.३७० कलम लागू झाल्याने मागील ७२ वर्षानंतर प्रथमच खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानातील घटनात्मक तरतुदीनुसार हे कलम लागू करून आता त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेनुसारच कामकाज चालणार आहे. जुने सर्व कायदे आणि नियम रद्द करून भारताचे संविधान तिथे लागू करणारा हा योग्य व देशहिताचा निर्णय आहे. मात्र अनेक जण हे कलम न वाचताच त्यावर चर्चा करीत आहेत. ३७० कलम लागू करण्याच्या घटनेची टीकाकारांकडून ‘जम्मू-काश्मीरचा विश्वासघात’ अशी अवहेलना होत आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील घटनांचा मागोवा घेतला तर हा विश्वासघात नसून खरा न्याय असल्याचे व विश्वासघात यापूर्वीच झाला होता, याची कल्पना येईल.जम्मू-काश्मीरचा भूभाग पाकिस्तानात राहावा, ही ब्रिटनची इच्छा होती. मात्र राजा हरिसिंग यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हे शक्य झाले नाही. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी यासाठी जागृती केली. त्यांच्यासह १८ जणांनी देशात बलिदान दिले. पाच हजारांवर लोकांना कारागृहात डांबण्यात आले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या बलिदानांपैकी ७५ टक्के बलिदान काश्मिरात घडले. चार पिढ्या आणि ७२ वर्षांच्या संघर्षानंतर काश्मीरमध्ये आता हक्काचे राज्य आले आहे.प्रारंभी नागपुरातील काश्मिरी परिवारांकडून अरुण कुमार यांचे स्वागत करण्यात आले. सीएसआयआरचे वरिष्ठ प्रधान संशोधक डॉ. अवतार कृष्ण रैना यांनी प्रास्ताविक केले. मीरा खडक्कार यांनी ३७० कलम लागू झाल्याबद्दल अभिनंदनपत्राचे वाचन केले, तर अभिनंदन पळसापुरे यांनी अरुण कुमार यांचा परिचय करून दिला. संचालन प्रसन्ना चौधरी यांनी केले तर, उपस्थितांचे आभार सतीश मराठे यांनी मानले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.