नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार : गिरीश बापट यांची माहिती नागपूर : काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृत्रिमरीत्या भाज्या व फळे पिकविण्यास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियमातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे अन्न व औषधे प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितले.अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बापट बोलत होते. त्यांनी सांगितले की, अन्न पदार्थांची मानके, अन्न पदार्थावरील प्रतिबंध आणि निर्बंध इत्यादी नियमांचा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मध्ये समावेश आहे. या अधिनियमामध्ये गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार शिक्षेची तरतूद, ग्राहकाचे हित जपून नियमबाह्य पदार्थ बाजारातून माघारी बोलाविणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. विविध रसायनाचा वापर करून फळे व भाजीपाला पिकविला जातो. याला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे, वेळोवेळी फळे व भाज्या विक्रेत्यांची तपासणी करणे तसेच कृत्रिमरीत्या फळे न पिकविण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे, असेही बापट यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास प्रतिबंध
By admin | Published: December 24, 2015 3:36 AM