भिवापूर : कृत्रिम पाणी टंचाई भिवापूरकरांच्या पाचवीला पुजली आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर तरी किमान ही समस्या सुटेल हा आशावादही फोल ठरला. गत आठवडाभरापासून शहराचा अर्ध्याधून अधिक भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. नळाला पाणीच येत नसल्यामुळे भर उन्हात महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एकिकडे कोरोना तर दुसरीकडे पाणी टंचाई हे दोन्ही संकटे भिवापूरकरांच्या मानगुटीवर बसली आहे. नगरपंचायतीकडून शहराला विविध पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. यातील मोखाळा, नक्षी पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनमध्ये आठवडाभरापूर्वी लिकेज आल्यामुळे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला. यादरम्यान मुख्याधिकारी सुवर्णा दखणे रजेवर होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही मग टाईमपास करत लिकेजवर लेटलतिफ मलमपट्टी केली. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होताच, पुन्हा दोन दिवसांनी ही पाईपलाईन लिकेज झाली. त्यामुळे आता पुन्हा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. सदर योजनेतून बसस्थानक परिसरातील जलकुंभात पाणी साठवून नंतर धर्मापूर, सिनेमा टॉकीज, टिचर कॉलनी, धनगर मोहल्ला, आंभोरा रोड आदी अर्ध्याहून अधिक शहरभरात पाणी पुरवठा होतो. मात्र आठवडाभरासून पाणी पुरवठा ठप्प असल्यामुळे महिलांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता लिकेजेस दुरुस्त होताच, एक-दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने नगरसेवक घरी बसले आहे. दुसरीकडे तीन तालुक्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या मुख्याधिकारीही रजेवर असल्याने संपूर्ण शहराचा कारभार रामभरोसे आहे. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी प्रशासन कुठलीच पर्यायी व्यवस्था करत नसल्यामुळे नागरिकात असंतोष धुमसत आहे.
जलमित्र कुठाय?
नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण होणारी कृत्रिम पाणी टंचाई शहरवासीयांसाठी नवीन नाही. निवडणूकापूर्वी काही सामाजिक कार्यकर्ते ‘जलमित्र’ बनून शहरवासीयांच्या मदतीला धावायचे. स्वखचार्तून पाण्याचे टँकर पाठवून शहरवासीयांची तहान भागवायचे. मात्र हे जलमित्र अचानक कुठे गायब झालेत, असा प्रश्न भिवापूरकर आता विचारत आहे.
===Photopath===
180521\img_20210518_120133.jpg
===Caption===
राष्ट्रीयमार्गावर दिवसभर धो-धो वाहणा-या एका नळ वजा लिकेजच्या ठिकाणी भर उन्हातान्हात पाणी भरण्यासाठी आलेल्या महिला भगिनी