लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. टुल्लू पंपाचा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वापर होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.ओंकारनगर येथील अविनाश आदमने यांनी त्यांच्या घरातील नळाला पूर्ण दाबाने मिळणारे पाणी उन्हाळ्याला सुरुवात होताच अचानक कमी दाबाने येत आहे. यामुळे त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नोंदविली होती. आदमने यांच्या तक्रारीनुसार, ओसीडब्ल्यूच्या झोन पथकाने पाहणी केली असता, त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने टुल्लू पंप बसविल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त पाणी खेचत असल्याने आदमने यांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.अशाच प्रकारे सिंधी कॉलनी येथील जागरूक नागरिक दिनेश मुकादम यांनी ओसीडब्ल्यूच्या तक्रार निवारण केंद्राकडे कमी दाबाने पाणी मिळत असल्याची तक्रार केली. पथकाने शोध घेतला असता, येथेही कमी दाबाच्या समस्येचे कारण तेच आढळून आले. टुल्लू पंपाचा गल्लोगल्ली वापर केला जात असल्याने संपूर्ण परिसरात पाण्याची कृत्रिम समस्या निर्माण झालेली होती.उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या टुल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करीत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र यामुळे आपण इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत असल्याचा त्यांना विसर पडतो. टुल्लू पंपाचा वापर बेकायदेशीर असून हा दंडनीय गुन्हा आहे तसेच नळजोडणी कायमस्वरूपी बंदी करण्याची कारवाई होऊ शकते.टुल्लू पंप वापरणाऱ्यांची नळजोडणी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी शहरात टुल्लू पंप जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोबतच टुल्लू पंपाचा वापर न करण्याविषयी जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. टुल्लू पंपाचा वापर केल्यामुळे कमी दाबाची समस्या निर्माण होऊन सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.मुख्य जलवाहिनीला बुस्टरपंप अथवा तत्सम उपकरण लावून पाणी घेतल्यास कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अशा उपकरणाचा वापर करणाºयाचा पाणीपुरवठा खंडित करू शकतात तसेच हे उपकरण जप्त करू शकतात आणि त्या ग्राहकावर महापालिका कायदेशीर कारवाई करू शकते. तसेच जप्त केलेला पंप कुठल्याही परिस्थितीत परत केला जात नाही.महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी नागरिकांना टुल्लू पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच टुल्लू पंपाचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास जागरूक नागरिक मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर तक्रार करू शकतात, ओसीडब्ल्यूच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात ७२८०९०३६३६ या क्रमांकावर अथवा झोन मॅनेजर,मनपा डेलिगेटला मनपा-ओसीडब्ल्यू झोन कार्यालयात संपर्क करू शकतात.
टुल्लू पंपाचा वापर केल्यास पाणीपुरवठा बंदटुल्लू पंपाचा वापर केल्याने अतिरिक्त पाणी खेचले जाते. यामुळे अन्य लोकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. टुल्लू पंप वापरत असल्याचे आढळून आल्यास पंप जप्त केला जाईल. तसेच कायमस्वरुपी पाणीपुरवठा बंद केला जाईल. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी टुल्लू पंपाचा वापर करू नये.- संजय गायवाड, कार्यकारी अभियंता जलप्रदाय