लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कला, संस्कृतीच्या बाबतीत भारत देश जगात प्रसिद्ध आहे. याची प्रचिती वेळोवेळी विदेशी नागरिकांना आली आहे. २५ आॅगस्टला लंडन येथील भारतीय विद्या भवनात पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात नागपूरच्या तीन चित्रकारांनी आपल्या कला तिथे प्रदर्शित केल्या. या कलावंतांनी ज्या विषयावर चित्र साकरली. जी शैली चित्र साकारण्यास वापरली, त्याची भुरळ विदेशी नागरिकांना पडली.विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात शिक्षण घेतलेल्या सुप्रिया दुधाळ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन लंडन येथे केले होते. यात त्यांनी १८ कलावंतांना आमंत्रित केले होते. यातील ९ कलावंत भारतीय, १ कलावंत मलेशिया व इतर स्थानिक कलावंत होते. नऊ कलावंतापैकी तीन कलावंत हे नागपुरातील आहे. यात स्वत: सुप्रिया दुधाळ ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते, विराज जाऊळकर यांचा समावेश होता. भारतीय कलावंतांनी या प्रदर्शनात सादर केलेल्या चित्रकृती भारतीय संस्कृतीशी निगडित होत्या. कॅन्व्हासवर चित्रकृती साकारताना वापरलेली शैली, चित्रांची रंगसंगती विदेशी नागरिकांनाही आकर्षित करीत होती. या कलावंतांच्या काही पेंिटंगची विक्री झाली. प्रदर्शन संपल्यानंतरही तेथील नागरिकांकडून या कलावंतांना विचारणा होत आहे.
माझे पहिलेच प्रदर्शन विदेशात झाले. तेथील कलारसिकांना आमच्या चित्रांनी आकर्षित केले. प्रदर्शन बघायला आलेल्या रसिकांनी चित्रातील बारकावे, चित्रांचा विषय समजून घेतला. यातील माझी चित्रे आध्यात्मिक पार्श्वभूमीवर आधारित होती. यात भारतीय मंदिरांवरील कलाकुसर दर्शविली होती. सहज, सोप्या पद्धतीने साकारलेली चित्रांची मालिका भावभक्तीपुर्ण होती. तेथील रसिकांना या चित्रांमधून वेगळेपण जाणवत होते. या चित्रप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.- डॉ. मुक्तादेवी मोहिते, विभाग प्रमुख, ललित कला विभाग