दिग्दर्शक राजदत्त : संस्कार भारतीच्या अक्षरसाधना राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटननागपूर : कुठल्याही कलाकृतीसाठी साहित्याचे भान आवश्यक असते. साहित्य माणसाला समृद्ध करते आणि अनेक अनुभवांची शिदोरी देते. माझा प्रवास इथपर्यंत होऊ शकला त्याचे श्रेय साहित्यालाच आहे. साहित्याचा पाया आणि विचारांचे अधिष्ठान असल्याशिवाय कलाकृती लोकांपर्यंत पोहोचविताच येत नाही, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले. संस्कार भारतीच्यावतीने अक्षरसाधना राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन बी. आर. ए. मुंडले सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा कांचन गडकरी, आयोजन समितीचे पदाधिकारी विश्राम जामदार, राजन जयस्वाल, आशुतोष अडोणी, विवेक कवठेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राजदत्त म्हणाले, मी साहित्याचा आस्वादक आणि वाचक आहे. संत गुलाबराव महाराजांचे साहित्य वाचल्यावर शब्द डोळ्यांनी वाचायचे का, असा प्रश्न पडतो. मनाला दिसतो आणि बुद्धीला कळतो तो खरा शब्द आणि त्यानेच ज्ञान मिळते. कलेची एक भाषा असते, ती भाषा आत्मसात करता आली तर कलाकृती भावते, असे ते म्हणाले. संमेलनाची भूमिका प्रास्ताविकातून विवेक कवठेकर यांनी सांगितली. कांचन गडकरी यांनी संस्कार भारतीच्या कार्यावर प्रकाश टाकला. हे संमेलन कार्यशाळेसारखे असून नवोदितांना लिहिते करण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न म्हणजेच संमेलन आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कथास्पर्धेत २५० च्यावर कथा आणि कविता स्पर्धेत ६८७ कविता आल्यात. संमेलनाच्या स्मरणिकेत अनेक मान्यवरांचे लेख आहेत. यातील द. भि. कुलकर्णींचा लेख त्यांचा अखेरचाच ठरला पण त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला. याप्रसंगी अनिल शेंडे संपादित अक्षरगंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झाडीबोलीचे संशोधक प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, मुक्तिवाहिनीचे डॉ. का. रा. वालदेकर, अंकुर साहित्य संमेलनाच्या रेखाताई शेकोकार, मुलांचे मासिकचे जयिता आणि जयंत मोडक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कथा स्पर्धेतील विजेते प्रगती वाघमारे, योगेश नार्वेकर, लीलाधर दवंडे आणि शर्वरी पेठकर तर कविता स्पर्धेतील विजेते अनिरुद्ध पांडे, ज्ञानेश्वर बावीस्कर, रोशनकुमार पिलेवान, किरण डोंगरदिवे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्मिता खनगई यांनी केले. प्रारंभी संस्कार भारतीचे गीत आणि नृत्य संस्कार भारतीच्या कलावंतांनी सादर केले. (प्रतिनिधी)
साहित्य, विचारातूनच कलाकृती अस्सल होते
By admin | Published: February 01, 2016 2:47 AM