अरुण गवळीला पुन्हा हवी पॅरोल मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:08 PM2020-05-06T22:08:37+5:302020-05-06T22:11:16+5:30
लॉकडाऊन लांबल्यामुळे पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ मिळावी, याकरिता मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन लांबल्यामुळे पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ मिळावी, याकरिता मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून ८ मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
गवळीने पॅरोलमध्ये मुदतवाढ मिळण्यासाठी दाखल केलेली ही दुसरी याचिका होय. यापूर्वी न्यायालयाने त्याला १० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्याला २७ एप्रिल रोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, न्यायालयाकडून मिळालेल्या मुदतवाढीमुळे तो सध्या घरी आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.